Uncategorized

dunith wellalage : दुनिथ वेल्लालगेचा ‘पंच’, भारताची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : dunith wellalage : पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करून 356 धावांची मोठी धावसंख्या उभारणा-या टीम इंडियाच्या फलंदाजांनी मंगळवारी श्रीलंकेच्या फिरकी आक्रमणासमोर नांगी टाकली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामी जोडीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. पण गिल बाद होताच भारतीय फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतले. भारतीय टॉप ऑर्डरला सुरुंग लावण्यात श्रीलंकेच्या 20 वर्षीय दुनिथ वेल्लालगेने सिंहाचा वाटा उचलला. त्याने 10 षटकांत 40 धावा देऊन पाच फलंदाजांची शिकार केली. तर चरित असलंकानेही 4 विकेट्स घेऊन टीम इंडिला घाम फोडला.

वेल्लालगेच्या 'पंच'ने भारताची टॉप ऑर्डर फ्लॉप (dunith wellalage)

भारताच्या डावाच्या 11व्या षटकात वेल्लालगे गोलंदाजीसाठी आला आणि त्याने पहिल्याच चेंडूवर शुभमन गिल (19) याला क्लिन बोल्ड केले. त्यानंतर पुढच्याच षटकात त्याने विराट कोहलीला (3) मिडविकेटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या दासुन शनाकाकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर वेल्लालगे भारतीय कर्णधार रोहित शर्मा (53), केएल राहुल (39) आणि हार्दिक पंड्या (5) या दिग्गज फलंदाजांची शिकार करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय कर्णधाराचा हा निर्णय चुकीचा ठरल्याचे दिसून आले. दुनिथ वेल्लालागेने शुबमन गिलची विकेट घेऊन सलामी भागीदारी तोडली. त्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज वेल्लालगेच्या फिरत्या चेंडूंसमोर झुंजताना दिसले. एकंदरीत रविवारी आणि सोमवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना चोप-चोप चोपणारे विक्रमवीर भारतीय फलंदाज या 20 वर्षीय फिरकीपटूपुढे फ्लॉप ठरले.

वेल्लालगेने (dunith wellalage) आशिया कपच्या 4 सामन्यांत 9 विकेट्स घेतल्या असून तो आता पाकिस्तानचा हारिस रौफ आणि बांगलादेशचा तस्कीन अहमद यांच्यासोबत संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. एवढेच नाही तर या श्रीलंकन फिरकीपटूने भारताविरुद्ध पाच विकेट घेत एक मोठा विक्रमही केला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच बळी घेणारा तो श्रीलंकेचा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे. त्याने 22 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. जो 2001 मध्‍ये चरित बुद्धिकाने केला होता.

श्रीलंकेसाठी वनडे सामन्यात 5 बळी घेणारे सर्वात तरुण गोलंदाज (dunith wellalage)

20 वर्षे 246 दिवस : दुनिथ वेल्लालगे विरुद्ध भारत (2023, कोलंबो)
21 वर्षे 65 दिवस : चरिता बुद्धिका विरुद्ध झिम्बाब्वे (2001, शारजाह)
21 वर्षे 141 दिवस : थिसारा परेरा विरुद्ध भारत (2010, डंबुला)
21 वर्षे 241 दिवस : थिसारा परेरा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2010, मेलबर्न)
21 वर्षे 233 दिवस : उवैस करनैन विरुद्ध न्यूझीलंड (1984, मोरातुवा)

रंगना हेराथनशी तुलना

दुनिथ वेल्लालगेची तुलना श्रीलंकेचा दिग्गज रंगना हेराथशी करण्यात केली जाते. दुनिथ हा स्लो लेफ्ट ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. विशेष म्हणजे हे वेल्लालगेचे होम ग्राउंड आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी २००३ रोजी कोलंबो येथे झाला. सेंट जोसेफ कॉलेजमध्ये शिकलेल्या वेल्लालगेने अफगाणिस्तानला आशिया कपमधून बाहेर पाडण्यातही योगदान दिले होते. वेल्लालगेने श्रीलंका अंडर-19 आणि श्रीलंका अ संघांसाठीही चमकदार कामगिरी केली आहे. यासोबतच त्याने लंका प्रीमियर लीगमध्ये जाफना किंग्सकडून चमकदार कामगिरी केली आहे. तो श्रीलंकेतील स्थानिक कोल्ट्स क्रिकेट क्लबकडूनही खेळतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते वनडे पदार्पण

वेल्लालगेने यापूर्वी कसोटी पदार्पण केले आहे. गतवर्षी त्याने पाकिस्तानविरुद्ध गॉलमध्ये पदार्पण केले होते, मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. गेल्या वर्षी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणात त्याने 7 षटकांत 2 विकेट्स घेतल्या. वेल्लालगेने याआधी 12 एकदिवसीय सामन्यात 13 विकेट्स घेतल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT