आरवली : पुढारी वृत्तसेवा
संगमेश्वर तालुक्यातील आरवली-कुंभारखणी मार्गावर शनिवारी सकाळी मुरडव येथे डंपर तसेच दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात योगेश तुकाराम बाटे (वय 28) हा जागीच ठार झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की ः शनिवारी सकाळी 8.30 च्या सुमारास मुरडव बाटेवाडीतील योगेश तुकाराम बाटे हा आरवलीहून मुरडवकडे दुचाकीने (एमएच 04 डीएच 1983) चालला होता. मुरडव येथील वळणावर येताच समोरून येणार्या डंपर (एमएच 04 सीयू 9663) आणि त्याची दुचाकी यांच्यात धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील योगेश डंपरच्या मागील चाकावर आदळला. या अपघातात डंपरचे चाक योगेश बाटेच्या डोक्यावरून गेल्याने तोे जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती मिळताच जि. प. सदस्य शंकर भुवड, शिवसेना विभागप्रमुख मनू शिंदे, आंबव पोलिस तपासणी नाक्यावरील पोलिस गणेश बिक्कड,पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ संकेत भुवड, सुनील गंगारकर, तुकाराम मेणे, दिनेश परकर, मुकेश चव्हाण, धर्मा कोंडविलकर आदी मदतकर्ते घटनास्थळी धावून गेले. योगेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माखजन प्रा. आ. केंद्रात हलविला. डॉ. प्रदीप शिंदे यांनी शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी डंपरचालक राकेश लक्ष्मण कांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची खबर पोलिस पाटील राजा मेणे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताचा तपास माखजनचे हे. कॉ. प्रशांत शिंदे, तेजस्विनी गायकवाड करीत आहेत.