Uncategorized

India @ 75 : महात्‍मा गांधीजींचा ‘तो’ डाएट प्लॅन सुभाषचंद्र बोस यांनीही स्वीकारला होता!

रणजित गायकवाड

पुढारीऑनलाईन डेस्‍क : महात्मा गांधी यांची जीवनशैली ही आजच्‍या पिढीसाठीही कुतुहलाचा विषय आहे.  "तुम्ही जे खाता तसेच तुम्ही बनता!" अशी एक म्हण आहे… गांधीजींकडे पाहिले तर हे विधान तंतोतंत सिद्ध झाल्याचे दिसते. साधी राहणी आणि दृढ निश्चयाच्या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठा वाटा असणाऱ्या महात्मा गांधींचे कर्तृत्व आभाळाप्रमाणे आहे. एक धोतर परिधान करून आणि हातात काठी धरून ते जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या मार्गावर चालले होते, तेव्हा गंतव्यस्थानी पोहचणे अवघड होते. पण त्यांनी अहिंसा, नैतिकता आणि उपवासाच्या माध्यमातून ते कसे यशस्वी केले याची कथा आपण ऐकली वाचली आहे.

स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींनी अनेकवेळा उपोषण केली. त्यापैकी सर्वात मोठे उपोषण २१ दिवसांचे होते. गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी लढणे असो किंवा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे समर्थन असो, बापूंनी अहिंसा आणि सत्याच्या लढ्यात उपोषणाला आपले शस्त्र बनवले.

स्वातंत्र्य प्राप्तीसाठीच्या प्रदीर्घ लढ्याची प्रशंसा करणारे अनेक इतिहासकार आहेत; परंतु असे काही इतिहासकार आहेत ज्यांनी महत्मा गांधी यांच्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींकडे बारकाईने लक्ष दिले. आपल्या खाण्यापिण्याबद्दल बापूंचे म्हणणे होते की, "आहारविषयक प्रयोग करणे हा माझ्या आयुष्यातील एक छंद आहे. मला वेळोवेळी व्यस्त ठेवणाऱ्या इतर गोष्टींइतकीच ती माझ्यासाठी महत्त्वाची बाब आहे." चला तर जाणून घेऊया महात्‍मा गांधीजींचा आहार कसा होता या विषयी…

वैष्णव कुटुंबात जन्मलेल्या मोहनदास करमचंद गांधी ऊर्फ महात्मा गांधींनी लहानपणापासून शाकाहारी हाेते. बंडखोरी म्हणून त्‍यांनी मांसाहार केला; पण त्यानंतर त्यांनी आपल्या कृत्याचा पश्चाताप करत मांसाहाराचा पूर्णपणे त्याग केला. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला जाईपर्यंत गांधीजी 'परंपरेनुसार शाकाहारी' राहिले.

'गांधी बिफोर इंडिया' (Gandhi before India) या पुस्तकात, इतिहासकार रामचंद्र गुहा लिहितात की, हेन्री सॉल्टच्या 'प्ली फॉर वेजिटेरियनिज्म' (plea for vegetarianism) या पुस्तकाने गांधींना 'स्वेच्छेने शाकाहारी' बनण्यास मदत केली. जेव्हा गांधीजी शिक्षणासाठी लंडनला जात होते. त्यावेळी त्यांच्या आई आणि काकांनी त्यांना मांस, मद्य आणि चुकीची संगत या तीन गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. गांधीजींनी त्यांच्या आई आणि काकांना वचन दिले की ते लंडनमध्ये या गोष्टींपासून दूर राहतील. तेव्हापासून गांधीजींनी शाकाहार स्वीकारला.

लंडनमध्ये गांधींनी त्यांचा रूममेट जोशिया ओल्डफिल्डसोबत 'लंडन व्हेजिटेरियन सोसायटी'चा शोध घेतला. तिथे गेल्यावर त्यांनी पाहिले की भारताने जगभरातील अनेक लोकांना शाकाहारी बनण्यासाठी प्रेरित केले आहे. कसे ब्रिटीश सैनिक बीअर आणि बीफशिवाय जगू शकत नाहीत, तर भारतीय सैनिक केवळ डाळ-भात असे साधे अन्न खाऊन सुद्धा शौर्याने रणांगणात उतरतात हेही त्यांनी पाहिले.

गांधी आणि जोशिया यांनी 52, सेंट स्टीफन्स गार्डन, बेस्वॉटर या निवासस्थानी पार्ट्यांचे आयोजन केले होते. ज्यात पाहुण्यांना खाण्यासाठी डाळ-भात आणि बेदाणे दिले होते. गांधीजींनी आरोग्य आणि खाण्याच्या सवयींवरही अनेक पुस्तके लिहिली आहेत. यात 'डाएट अँड डाएट रिफॉर्म्स' (diet and diet reforms), 'द मॉरल बेसिस ऑफ व्हेजिटेरियनिझम' (The moral basis of vegetarianism) आणि 'की टू हैल्थ'(Key to Health) या महत्त्वाच्या पुस्तकांचा समावेश आहे.

गांधीजींनी 'द मॉरल बेसिस ऑफ व्हेजिटेरियनिझम' (The moral basis of vegetarianism) या पुस्तकात शाकाहारी आहारावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात ते म्हणतात की, 'शाकाहारी भोजन केल्याने मन सात्विक होते आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते. त्याच वेळी, ते आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. सर्व पोषक तत्वे फळे आणि भाज्यांमध्ये आढळतात. ज्यामुळे माणूस नेहमी निरोगी राहू शकतो. याउलट, मांसाहार केल्याने व्यक्ती कधीच सात्विकता प्राप्त करू शकत नाही. त्याचे मन कधीही शांत राहू शकत नाही.'

शाकाहार स्वीकारलेल्या गांधीजींनी पुढे जाऊन जेवणात चवीसाठी वापरण्यात येणा-या मसाल्यांचा वापरही बंद केला. ते त्यांनी केवळ उकडलेल्या भाज्या खाण्यास पहिली पसंती दिली. तसेच शेळीच्या दुधाचे सेवन करण्यास सुरुवात केली.

साबरमती आश्रमात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना गांधीजींचे हे नियम अंगीकारणे सोपे नव्हते. 'द टाइम्स ऑफ इंडिया'मधील एका लेखात डॉ. विक्रम यांनी लिहिले आहे की, कुटुंबातील महिला सदस्यांना अशा आहाराचे अनुकरण करणे किती कठीण होते.

गांधींचा दुसरा मुलगा मणिलाल यांची पत्नी सुशीला यांनाही साबरमती आश्रमात अशा आहारावर राहणाऱ्यांमध्ये समावेश होता. मणिलाल यांचे चरित्र 'गांधीजींचा कैदी' लिहिणा-या त्यांची नात उमा धुपेलिया मिस्त्री यांच्याशी बोलताना सुशीला यांनी खूप महत्त्वाचे माहिती दिली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या, 'मला साबरमती आश्रमातील अजूनही जेवण आठवते. उकडलेली वांगी, उकडलेली बीट, करीमध्ये उकडलेल्या भाज्या, लोणी-तूप न लावता भाजलेल्या भाकरी. त्यावेळी मी हे सर्व एखाद्या औषधाप्रमाणे खात असे.' सुशीला यांची धाकटी मुलगी इला पाच वर्षांची असताना तिने बापूंना सांगितले की आश्रमाचे नाव बदलून कोलग्राम ठेवावे. तिथला उकडलेला भोपळा खाऊन तिला कंटाळा आला होता.

पत्रकार विक्रम यांच्याशी बोलताना इलाने एक रहस्य उघड केले. सेवाग्राममध्ये सर्वांचे जेवण एकाच स्वयंपाकघरात बनवले जात असे, जे गांधीजी आणि त्यांचे अनुयायी खात. पण 'बा' (कस्तुरबा गांधी) यांचे एक खासगी स्वयंपाकघर होते जिथे त्या आपल्या नातवंडांसाठी मिठाई बनवत असत. याचा पुरावा म्हणजे गांधीजींनी त्याकाळी आश्रम व्यवस्थापकाला 1942 साली लिहिलेले पत्र. ज्यात बापूंनी म्हटले आहे की, 'कारखान्यातील साखर आणू नये. पण जोपर्यंत बा (कस्तुरबा गांधी) आहेत तोपर्यंत हे चालूच ठेवावे.'

गांधीजी आपल्या अनुयायांव्यतिरिक्त इतरांनाही आहारविषयक सल्ले देत असत. प्रमोद कुमार यांनी त्यांच्या गांधी : अ‍ॅन इलस्ट्रेटेड बायोग्राफी (Gandhi: An Illustrated Biography) या पुस्तकात 300 छायाचित्रांच्या माध्यमातून महात्मा गांधीजी यांची मानवी बाजू अधिक ठळक करण्याचा प्रयत्न केला आहे. गांधीजींनी 1936 मध्ये त्यांचे समकालीन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी आहार टेबल तयार केलेले एक चित्र देखील आहे.

या पुस्तकात असेही एक छायाचित्र आहे, ज्यात 1936 मध्ये स्वत: गांधीजींनी त्यांचे समकालीन स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी डाएट प्लॅन तयार केला होता. या डाएट प्लॅनमध्ये गांधीजींनी लिहिले होते की, 'पश्चिमेकडे कच्चे कांदे आणि लसूण खाण्याची शिफारस केली जाते. रक्तदाबासाठी मी कच्चा लसूण नियमितपणे खातो. हे सर्वोत्तम अँटीटॉक्सिन आहे. क्षयरोगाच्या रुग्णांना ते खाण्याचा सल्ला दिला जातो.'

ते पुढे लिहितात, 'या दोन भाज्यांबद्दल निर्माण झालेला पूर्वग्रह त्यांच्या वासामुळे आहे असे मला वाटते. आयुर्वेद नकळत या दोन्ही गोष्टींची स्तुती करतो. लसणाला गरिबांची कस्तुरी म्हणतात. कांदे आणि लसूण न वापरता गावकरी कसे जगतील हे मला माहीत नाही.'

SCROLL FOR NEXT