देवगड : सूरज कोयंडे
देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकला जात आहे. मात्र, देवगड हापूस व कर्नाटक आंबा यामधील फरक सर्वसामान्यांना ओळखणे कठीण असले तरी देवगड हापूस आंब्याचा वास व चव यावरून देवगड हापूस आंब्याची ओळख ठरते. हापूसच्या चवीला एक फ्लेवर आहे. हा आंबा खाल्ल्यानंतर ते लक्षात येते. अस्सल देवगड हापूस आंबा खरेदी करण्यासाठी जीआय मानांकन होल्डर शेतकर्यांकडून देवगड हापूस खरेदी करणे वा थेट देवगडमधील बागायतदारांकडे जाऊन खरेदी करणे आवश्यक आहे, असे मत देवगड येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनी व्यक्त केले.
देवगड हापूसला आलेली चव ही देवगडमधील कातळावरील लागवडीमुळे आली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातं होणारा हापूस हा एकाच कलम लागवडीवरून होतो. देवगडमध्ये लागवड केलेली कलमे ही रत्नागिरीहून आणून लावली आहेत. यामुळे देवगड हापूसचा रंग, चव हा देवगडचा भोैगोलिकतेची देणगी आहे.कर्नाटक हापूसची लागवड ही रत्नागिरी व देवगडहून नेलेल्या कलमांपासूनच करण्यात आली आहे. मात्र, लागवड करणारे कर्नाटक हापूसला भूभागाची देणगी देवू शकले नाहीत.
कर्नाटक हापूस व देवगड हापूसमध्ये चाणाक्षच फरक करू शकतो.अन्यथा फसवणूक ठरलेली असते.आंब्याची चव हा प्रामुख्याने असलेला फरक आहे.मात्र हा फरक आंबा विकत घेतल्यानंतर ओळखता येत असल्याने त्याचा फारसा उपयोग होत नाही.सध्या मुंबई मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कर्नाटक आंबा विक्रीस आला आहे. या आंब्याचा दर 300 रुपये डझनपासून आहे तर देवगड हापूसचा दर डझनाला 500 ते 1 हजारपर्यंत आहे.कर्नाटक आंबा विकताना देवगड हापूस आंबा लिहिलेले रिकामे बॉक्स तसेच स्थानिक वृत्तपत्राची मराठी रद्दी ही आवर्जून वापरली जाते. यामुळे नक्की पॅकिंग कुठे केले याबाबत फारशी माहिती उपलब्ध होत नाही. मात्र, देवगड हापूसच्या बॉक्सचा वापर करून विक्री केलेला कर्नाटकी आंबा हा कमी दराने विकला जात असल्याने त्याचा फटका देवगड हापूस आंब्याच्या दरावर होत आहे. कर्नाटक आंबे विशेष करून उत्पादन होत असलेले ठिकाण वगळून सर्वत्र विक्री केले जात आहेत. देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकणार्यांवर कारवाई होवू शकते, असे मत विद्याधर जोशी यांनी व्यक्त केले.हापूसला जीआय मानांकन प्राप्त झाल्यामुळे ग्राहकांनी अस्सल हापूस घ्यावयाचा असल्यास जीआय मानांकन नोंदणीकृत असलेल्या बागायतदारांकडून घ्यावा व देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा विकत दिला जात असल्यास त्याबाबत खात्री करावी.
जैतापूर ते आचरा देवगड हापूसचा पट्टा
जैतापूर ते आचरा या किनारपट्टीच्या भागात तसेच समुद्र किनार्यापासून 15 मीटरचा रुंद पट्टा हे देवगड हापूसच्या उत्पादनाचे प्रमुख ठिकाण आहे. वेंगुर्ले, मालवण भागातही तसेच देवगड तालुक्यातील शिरगावपासून पुढे असलेल्या बागांचा आंबा हा किनारपट्टीला होणार्या आंब्यापासून थोडासा वेगळा आहे.