नाशिक : दीपिका वाघ
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणार्या दादासाहेब फाळके यांच्या 78 व्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी (दि.16) सर्वत्र त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला; परंतु ज्यांच्या दूरदृष्टीमुळे चित्रपटाची पाळेमुळे नाशिक शहरातून देशभर रोवली गेली, त्या दादासाहेबांचे नाशिक शहर चित्रपटनगरी होण्याचे स्वप्न त्यांच्या 78 व्या स्मृतिदिनानंतरही अपूर्णच असल्याची खंत कलाप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने 2009 मध्ये तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी त्याबाबत प्रस्ताव दिला होता. महाविकास आघाडीचे सरकार असताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी फिल्मसिटी शहरात तयार व्हावी, यासाठी सकारात्मकता दर्शवली. ज्या ठिकाणी फिल्मसिटी उभी राहणार त्या इगतपुरी तालुक्यातील महामार्गालगतच्या मुंढेगाव येथील गायरान जागा शासनाने विविध कार्यांसाठी मंजूर केली होती. आता उरलेली जागा फिल्मसिटीला मिळावी, याबाबत प्रयत्न झाले. पण, गावकर्यांनी विरोध केल्यामुळे प्रस्ताव डब्यात गेला. गायरान जमीन पडून असल्याने जिल्हा परिषदेच्या वतीने प्रयत्न होण्याची आता गरज आहे. फिल्मसिटीसाठी मंजूर झालेली जमीन सांस्कृतिक खात्याकडे वर्ग झाल्यानंतरच फिल्मसिटीच्या पुढील कामाला आरंभ होऊ शकतो. शासनाने फिल्मसिटीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. सांस्कृतिक खात्याने 2009 मध्ये फिल्मसिटीसाठी 80 कोटी निधी मंजूर केला होता. परंतु जोपर्यंत जागा सांस्कृतिक खात्याच्या अखत्यारित येत नाही, तोपर्यंत त्यासाठी निधी खर्च करता येणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.
शूटिंगसाठी सोयीचे ठिकाण
700 एकरांत उभी असणारी गोरेगाव फिल्मसिटी आता भरली असून, तिला नाशिक उत्तम पर्याय ठरू शकते. जवळ असल्याने मुंबईतील कलाकरांसाठी नाशिक सोयीचे ठरणारे आहे. शहरात आजवर पीके, खाकी, गोदावरी, जोगवा, सावरखेड एक गाव, बुलेटराजा यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचे शूटिंग झाले. त्र्यंबकेश्वर, कसारा, इगतपुरी तसेच शहराजवळील बहुसंख्य ठिकाणे व परिसर शूटिंगसाठी अनुकूल आहे.
ज्या गावी चित्रपटाचा जन्म झाला, अशा नाशिक शहरात फिल्मसिटीची निर्मिती होणे, ही नाशिककरांसाठी ऊर्जा देणारी गोष्ट आहे. फिल्मसिटीच्या कामकाजासाठी राजकीय पाठबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांना कल्पना आवडली असून, लवकरच त्यावर बैठक बोलावली जाणार आहे. – श्याम लोंढे, समितीप्रमुख, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ.