रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरालगतच्या खेडशी ग्रामपंचायतीमध्ये नळ पाणीपुरवठा योजनेत 12 लाख 61 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. अपहार करणार्या लिपिकेला ग्रामपंचायत पाठीशी घालत असल्याचे दिसून आल्यानंतर जि.प. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या लिपिकेवर त्वरित कारवाई करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस ग्रा. पं. च्या ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला बजावली आहे.
खेडशी नवेदरवाडी, गयाळवाडी, नवीन वसाहत नळपाणी योजना 2008-9 मध्ये भारत निर्माण योजना कार्यक्रमातून मंजूर झाली. 2 कोटी 25 लाख 31 हजार रुपये खर्चाची ही योजना होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाला केली होती. त्याचबरोबर ग्रामस्थ शैलेश सावंतदेसाई यांनी 19 जुलै 2019 रोजी याबाबत पुन्हा जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी पत्र देऊन चौकशीची मागणी केली होती.
या नंतर जि.प. प्रशासनाने पंचायत समितीला चौकशीचे आदेश दिले होते. ही चौकशी पूर्ण झाली असून त्यासंदर्भातील अहवाल जि.प. प्रशासनाकडे सादर केला आहे. यामध्ये लिपिका सौ.विधी वैभव सावंतदेसाई यांनी भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर ही नळपाणी योजना तांत्रिकदृष्ट्या पूर्ण होण्यापूर्वीच योजना चालवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबतचा निर्णय घेतला गेला, असा ठपकाही समितीवर ठेवण्यात आला आहे.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर लिपिका सौ. सावंतदेसाई यांच्यावर समितीने कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. यामुळे पुन्हा ग्रामस्थांनी जि. प. प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर जि.प. ग्रामपंचायत विभागाने या समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
संबंधित लिपिकेने आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या चौकशीच्या वेळेस पाणी पुरवठा, स्वच्छता समितीचे दप्तर अपूर्ण असल्याचे त्यावेळी आढळून आले होते. संबंधित कर्मचारी यांनी ते दप्तर पूर्ण केल्यावर समितीच्या उपलब्ध दप्तराची पडताळणी करता समितीच्या खात्यामधील दि.7 जानेवारी 2015 पासून दि.15 ऑक्टोबर 2019 पर्यंतच्या कालावधीत वसूल रक्कम बँकेत न भरता नियमापेक्षा जास्त हात शिल्लक ठेवल्याचे चौकशीत आढळले. यामुळे सौ. सावंतदेसाई यांनी 12 लाख 61 हजार 626 इतकी नियमबाह्य हात शिल्लक ठेवल्याचे दिसून येत असल्याचे नोटीशीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता समितीने नियुक्त केलेल्या लिपिक सौ. सावंतदेसाई यांनी आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे. त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी समितीची असताना या बाबीकडे दुर्लक्ष केल्याचे सिद्ध होत आहे. तसेच मे 2019 मध्ये ही बाब निदर्शनास येऊनही समितीने संबंधित कर्मचार्याविरूद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून समिती या गैरकृत्यास पाठिंबा देत असल्याचे दिसून येत असल्याचे नोटीशीमध्ये म्हटले आहे.
या सर्व प्रकाराबाबत आपल्याला दोषी धरून आपल्याविरूद्ध कारवाई का करू नये, याचा खुलासा त्वरित करावा. त्याचबरोबर सदर कर्मचारी सौ.सावंतदेसाई यांच्या विरोधात गंभीर स्वरुपाची कारवाई तत्काळ करावी, तसा अहवाल प्रशासनाला पाठवावा असे या नोटीशीमध्ये म्हटले आहे.