Uncategorized

आषाढी वारी झाल्यावर जगातील कोरोना नामशेष होईल : संभाजी भिडे 

Pudhari News

सांगली पुढारी वृत्तसेवा : पंढरपूरची आषाढी वारी झाल्यावर देशातील नव्हतेतर जगातील कोरोना आटोक्यात नाहीतर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्याने सगळी काही विघ्नं नाहीशी होतात. त्यामुळे पायी वारी करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली.

ते म्हणाले, आपल्या सर्वांना कोरोना मुक्त हिंदुस्थान व्हावा असे वाटते आणि ते होणार आहे. त्यामुळे पायी वारीला परवानगी द्यावी अशी त्यांनी मागणी केली. यावेळी श्रीशिवप्रतिष्ठानच्यावतीने निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशा पायी वार्‍या करणारे लाखो वारकरी आहेत. वर्षानुवर्षे ही परंपरा आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे वारीची परंपरा खंडीत झाली आहे. परंतु वर्षी पंढरीच्या वारीसाठी वारकरी उत्सुक होते. राज्यातील काही जिल्हे वगळता कोरोना संसर्ग कमी आहे. राज्यातील इतर सर्व राजकीय कार्यक्रम सुरू आहेत. या पार्श्वभुमीवर शासनाचे सर्व नियमांचे पालन करुन वारकरी वारीमध्ये सहभागी होण्याचे मान्य केले होते. असे असताना चर्चेचे निमित्त करून केवळ शंभर जणांना घेवून पालख्या निघाव्यात असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र शंभर जणांची पायी वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच संताच्या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

हा शासनाकडून वारकर्‍यांचा विश्वासघात असून ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी शासनाचा विरोध झुगारुन पायीच वारी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे त्यांना फलटण येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. वारकरी सांप्रदायकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. पंढरपूर वारीची परंपरा खंडीत होवू नये यासाठी पायी दिंडीला परवानी देण्याचे या निवेदनात म्हटले आहे.

वाचा : सांगली : मामाच्या मुलीशी लग्न होऊनही दुसऱ्या मामाची मुलगी पळवणाऱ्या तरुणाचा निर्घृण खून! 

वाचा : सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक

SCROLL FOR NEXT