Uncategorized

Corona Restrictions : सोलापूरसह 11 जिल्ह्यांत निर्बंध होणार शिथिल

रणजित गायकवाड

मुंबई/कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : Corona Restrictions सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारासह कोरोना निर्बंधांच्या तिसर्‍या टप्प्यात असलेल्या 11 जिल्ह्यांना लवकरच निर्बंधांतून काहीशी शिथिलता मिळणार आहे.

याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून, शिथिलतेसंबंधात येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

आपत्ती व व्यवस्थापन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या तिसर्‍या श्रेणीत येणार्‍या शहरांमध्ये निर्बंध कायम ठेवण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होती. या श्रेणीत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांसह कोकणचेही जिल्हे येतात.

प्रत्येक जिल्ह्याची कोरोना स्थिती वेगळी आहे. त्यामुळे त्या-त्या जिल्हाधिकार्‍यांनी रुग्णस्थिती पाहून बाजारपेठा उघडण्यासंदर्भात आणि दुकानांच्या वेळा ठरवण्याबद्दल स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले आहे.

मुंबई, ठाण्यासह 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. यामध्ये दुकाने, रेस्टॉरंटस्, हॉटेल्स सुरू ठेवण्यास रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी मिळू शकते. कर्मचार्‍यांचे लसीकरण झाले असल्यास थिएटर्सही सुरू होऊ शकतात.

शनिवारी दुकाने सुरू राहणार

राज्यात सध्या सर्वत्र वीकेंड लॉकडाऊन आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकाने बंद असतात. आता या 25 जिल्ह्यांत शनिवारीही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळू शकते.

लग्न समारंभासाठी 100 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. खासगी कार्यालयांना 50 टक्के उपस्थितीला परवानगी, नाटक, सिनेमागृहांमध्ये 50 टक्के उपस्थिती, थिएटर व व्यायामशाळांना निर्बंधांतून काही प्रमाणात सूट मिळू शकते.

सोलापुरातील निर्बंध शिथिल करण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. परंतु, आज यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.
मिलिंद शंभरकर
जिल्हाधिकारी, सोलापूर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT