Uncategorized

महिलांसाठी पोलीस गस्त वाढवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : महिलांची वर्दळ जास्त आहे किंवा महिलांना जास्त धोका आहे अशा सर्व ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबई पोलिसांना दिले.

साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घृण बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करा आणि जलदगती न्याय काय असतो ते अशा नरराक्षसांना दाखवून द्या म्हणजे पुन्हा कुणी अशी हिंमत करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला सांगितले.

साकीनाक्यातील पीडित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे उपस्थित होते.

नराधमाला अजिबात वेळ न देता गजाआड केले याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र आता जलदगती न्यायालयात खरा कस लागेल याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकार्‍यांना करून दिली. सर्व न्यायवैद्यकीय , इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच साक्षीदारांचे पुरावे व्यवस्थित जमा करून हे प्रकरण न्यायालयात मजबुतीने मांडावे तसेच कुठेही कमतरता राहणार नाही हे पाहण्याचे निर्देश यावेळी दिले.

एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल झाले पाहिजे. न्यायालयात खटला उभा राहील त्याची वाट न पाहता उद्यापासूनच विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्त करून काम सुरु करावे असेही निर्देश दिले.

जलदगती न्यायालयात खटला चालवणार

पिडीत दुर्दैवी महिलेस न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होईल असे पाहावे लागेल. मुंबई हे देशातील एक सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. लोकांचा पोलिसांवर आणि कायदा व सुव्यवस्था यावर विश्वास आहे. मात्र अशा घटनेमुळे आपल्याला अधिक सतर्क राहावे लागेल.

महिला सुरक्षेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही विशेष सूचना पोलीस प्रशासनास दिल्या त्या अशा –

महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी

महिलांवर हल्ले होऊ शकतात किंवा त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उदभवू शकतो अशी शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करून याठिकाणी गस्त वाढवावी

 प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकार्‍याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस रात्र वेळोवेळी भेटी द्याव्यात

स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणी देखील पोलिसांनी बारकाईने नजर ठेवावी

 महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे

गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्वाची भूमिका असते, त्यामुळे दुसर्‍या टप्प्यातील कॅमेरे शहरात उर्वरित महत्वाच्या ठिकाणी बसविण्याची कार्यवाही लगेच सुरु करावी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT