सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी
जिल्हास्तरीय स्वच्छ व सुंदर अंगणवाडी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत कुडाळ तालुक्यातील ओरोस-देऊळवाडा अंगणवाडीने 100 पैकी 100 गुण मिळवीत प्रथम क्रमांक, देवगड तालुक्यातील कुणकेश्वर -चांदेलवाडीने द्वितीय, तर मालवण तालुक्यातील चिंदर-भटवाडी अंगणवाडीने तृतीय क्रमांक मिळविला. पैकी ओरोस-देऊळवाडा अंगणवाडीची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
राज्य महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर स्वच्छ सुंदर अंगणवाडी स्पर्धा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही स्पर्धा घेण्यात आली होती. तालुक्यातील प्रथम तीन क्रमांकाची निवड करून एकूण 24 अंगणवाड्यांची निवड जिल्हास्तरासाठी करण्यात आली होती. त्यातून तीन क्रमांक निवडण्यात आले.
ही स्पर्धा एकूण शंभर गुणांची होती. यापैकी प्रथम क्रमांक प्राप्त ओरोस-देऊळवाडा अंगणवाडी ने 100 पैकी 100 गुण मिळवून जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविला, द्वितीय कुणकेश्वर- चांदेलवाडी अंगणवाडीला 99 गुण तर तृतीय चिंदर-भटवाडी अंगणवाडीला 97 गुण मिळाले. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त ओरोस- देऊळवाडी अंगणवाडीने यापूर्वी आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे. येथील अंगणवाडी सेविका साधना सावंत यांना जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार मिळाला आहे. यासाठी मदतनीस नूतन घाडीगांवकर यांचे कार्य मोलाचे आहे. या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल विकास विभागाचे सचिव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी, पाणी व स्वछता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कणकवली तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी या समितीने मुल्यांकन करुन ही निवड केली.