चिपळूण पुढारी वृत्तसेवा : येथील पंचायत समितीच्या अखेरच्या मासिक सभेत कृषी विभाग अंतर्गत राबविण्यात येणार्या रोजगार हमी योजनेमध्ये गैरप्रकार आढळून आला असून या प्रकरणी कंत्राटी लिपीकावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्री. अडके यांनी सभागृहात दिली.
कृषी विभाग अंतर्गत रोजगार हमी योजनेतून विविध योजना राबविण्यात येतात. यावेळी येथील कंत्राटी लिपीक याने कुटुंबातील व्यक्तींच्या नावे जॉब कार्ड काढून सुमारे एक लाख रूपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. घरातील आई-वडील व अन्य कुटुंबियांचे जॉब कार्ड काढून त्यांचे मानधन परस्पर वळते केले.
हा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबंधित महाडिक नामक कंत्राटी लिपीकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल्याची श्री. अडके यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणी संबंधित कृषी अधिकारी व पर्यवेक्षक यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी माहिती पं. स. सदस्य राकेश शिंदे यांनी दिली.
हा प्रकार तालुका कृषी अधिकार्यांच्या निदर्शनास का आला नाही? त्यांना स्वाक्षरीचा अधिकार असताना हा गैरप्रकार घडलाच कसा असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. महाडिक नामक व्यक्तीने पंचायत समिती व कृषी विभागातील पासवर्ड व अन्य संगणकीय संकेतांकाचा वापर करून हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधितावर आता फौजदारी कारवाई होणार आहे.
या सभेत महिला बचतगटांची रक्कम लाटल्याप्रकरणी पाच लाख रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचा मुद्दादेखील उपस्थित झाला. पं. स. सदस्य राकेश शिंदे, नितीन ठसाळे यांनी हा मुद्दा उचलून धरला. चौदाव्या वित्त आयोगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी तालुक्यात अठरा ठिकाणी शिबिरे घेण्यात आली.
यावेळी शिबिरार्थींना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, ज्या विस्तार अधिकार्यांवर ही जबाबदारी होती त्यांनी बचतगटांना जेवणाचे पैसे दिले नाहीत. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मानधन देखील दिले नाही असा ठपका ठेवला होता. या बाबत गटविकास अधिकार्यांनी चौकशी करावी असे ठरविण्यात आले होते.
त्यानुसार हा चौकशी अहवाल गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी सभागृहासमोर मांडला. संबंधित शिंदे नामक विस्तार अधिकार्याने काही बचतगटांना रोख तर काहींना धनादेशद्वारे रक्कम दिल्याचे सांगितले.