जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा: चिंचवाड (ता. शिरोळ) येथील नंदीवाले वसाहतीमधील चंपाबाई भूपाल ककडे (वय 65) या महिलेचा साडीने गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी परिसरातीलच प्रकाश लक्ष्मण नंदीवाले (वय 33) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने 72 तासांत अटक केली. ककडे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची कबुली त्याने दिली आहे. पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेचा खून केला व दागिने लंपास केले. हा गुन्हा 72 तासांत उघडकीस आणल्याने गुन्हे अन्वेषण पथकाला पोलिस प्रमुखांनी 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
घटनास्थळी जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. या पथकात पो.नि. संजय गोर्ले, स.पो.नि. किरण भोसले व त्यांच्या सहकार्यांचा समावेश होता. त्याचबरोबर डीवायएसपी रामेश्वर वैजाने, पो. नि. दत्तात्रय बोरीगिड्डे यांचे विशेष सहकार्य लाभले.
घटनास्थळी एक टोपी सापडली होती. टोपीवरून वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. टोपीप्रमाणे संशयित मोटारसायकलवरून दिसून आला होता. हा युवक चौंडेश्वरी सूतगिरणीवरून शिरोळ मार्गाने जात असताना मंगोबा मंदिराजवळ गुन्हे अन्वेषण पथकाने प्रकाश नंदीवाले यास थांबवले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर या खुनाचा उलघडा झाला.
दोन दिवस रेकी केली. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पाणी मागण्याचा बहाना करून घरात गेलो. चंपाबाई ककडे यांनी पाणी दिल्यानंतर त्यांच्यावर झडप घालून गळा दाबून खून केला. नंतर अंगावरील दागिने काढून घेऊन मोटारसायकलने पसार झाल्याची कबुली नंदीवाले याने दिली.