Uncategorized

पुणे : ऑनलाईन दारू खरेदी करताना फसवणूक 

Pudhari News

पुणे : प्रतिनिधी 

मध्यरात्री व्‍हिस्‍की पिण्याची ईच्छा एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. ऑनलाईन दारू खरेदी करताना एटीएमची गोपनीय माहिती काढून घेतली. दरम्यान, व्‍हिस्‍की पोहचविण्यासाठी डिलेव्हरी बॉय उपलब्ध नसल्याचे सांगत काढून घेतलेले 1 हजार 850 रूपये परत करण्याच्या नादात तब्बल 26 हजार 652 रूपये काढून घेतल्याचा प्रकार हडपसर येथील महमंदवाडी येथे घडला. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारक व्यक्तीवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याप्रकरणी दिव्येश जयेशकुमार पाठक(रा.महंमदवाडी, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

2 नोव्हेंबरच्या रात्री फिर्यादीला  व्हिस्की पिण्याची ईच्छा झाल्याने त्यांनी गुगलवर कोणते वाईन शॉप सुरु आहे हे सर्च केले. त्यांना मगरपट्टा हडपसर येथील सनी वाईन शॉप सुरु असल्याचे समजले. त्यांनी संबंधीत नंबरवर संपर्क केला असता, समोरील व्यक्तीने शॉप बंद झाले आहे, होम डिलिव्हरी मिळेल असे सांगितले.  होम डिलिव्हरी करणार्‍याने शॉपवरील माल घेण्यासाठी आपले डेबीट कार्ड रजिस्टर करावे लागेल व त्यानंतर पैसे ट्रांन्सफर होऊन पत्त्यावर ऑर्डर पाठवली जाईल असे सांगितले. फिर्यादीने त्यांच्या एटीएम कार्डवरील नंबर सांगितल्यावर त्यांच्या खात्यातून 1850 रुपये समोरील व्यक्तीच्या खात्यावर ट्रांन्सफर झाले. त्यांनतर समोरील व्यक्तीने होम डिलिव्हरी बॉय नसल्याचे सांगत, डिलिव्हरी होऊ शकत नाही. आपण जमा केलेले पैसे आपल्या खात्यावर जमा करण्यासाठी फिर्यादी यांना ओटीपी शेअर करण्यास सांगून ,त्यांच्या खात्यातून पुन्हा 9 हजार 901 रुपये काढून घेतले. यानंतर फिर्यादीला तुमचा ओटीची नंबर चुकीचा असून आलेला दुसरा ओटीपी नंबर शेअर करण्यात सांगितले. यानंतर पुन्हा त्यांच्या खात्यातून 9 हजार 901 रुपये काढून घेतले. याप्रकारे 26 हजार 652 रूपये काढून घेतले. फिर्यादीला पैसे निघाल्याचा बँकेचे मेसेज आल्यावर त्यांनी संबंधीत क्रमांकावर संपर्क साधला. मात्र संबंधीत क्रमांक बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT