पुणे: पुढारी वृत्तसेवा: गुंतवणुकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांचे पैसे वेळेवर परत न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अमित कांतीलाल लुंकड (वय ४८, रा. कोनार्क इस्टेट, पुना क्लबच्या समोर) यांना विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी एक लाखांच्या वैयक्तीक जात मुचलक्यासह कडक अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. याबाबत संजय विलास होनराव (वय ४८, रा. दत्तनगर, आंबेगाव) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणात महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा : पुणे : भाजीपाल्याच्या नावाने १४ टन गोमांसची वाहतूक
या फर्मच्या कल्याणीनगर येथील स्कॉय वन बिल्डिंगमधील कार्यालयात फिर्यादी संजय होनराव यांनी अमित लुंकड यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी संजय यांना तुम्ही गुंतविलेल्या रकमेवर प्रतिमहिना १५ टक्के परतावा देऊ, असे प्रलोभन दाखविले. त्यामुळे विश्वास ठेवत फिर्यादीने अमित लुंकड रिअॅलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या फर्ममध्ये वेळोवेळी पैसे भरून २१ लाख २६ हजार ८७५ रुपयांची गुंतवणूक केली. दरम्यान, ठरल्याप्रमाणे गुंतविलेल्या रकमेवर प्रतिमहिना १५ टक्के परतावा न देता फिर्यादीची अमित लुंकड यांनी फसवणूक केली. यानंतर फिर्यादीने तक्रार दाखल केली होती.
वाचा : गणवेश पोलिस उपनिरीक्षकाचा अन् नेमप्लेट सहाय्यक निरीक्षकाची; ५१ लाखांना गंडा घालणारा ताब्यात
दरम्यान न्यायालयात झालेल्या दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर, न्यायालयाने अमित लुंकड यांना आठ दिवसाच्या आत पोलिसांकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. महिन्यातून दोनदा येरवडा पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यासोबत जामीन झालेल्या दिवसापासून आठ दिवसांत लुंकड यांनी न्यायालयात हमीपत्र द्यावे, गुंतवणुकदारांची ठेवींची मुदत संपली आहे. त्यांनी मागणी केल्याप्रमाणे लुंकड यांनी गुंतवणुकदारांचे पैसे परत केले नाही तर त्यांच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणून त्यांची विक्री करून गुंतवणुकदारांचे पैसे देण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अमित लुंकड यांच्या घरच्यांनी पॉपर्टीसंदर्भात कसलेही अडथळे निर्माण न करता हक्क दाखवायचे नाहीत. तसेच गुंतवणुकदारांनी मागितल्याप्रमाणे पैसे दिले नाही तर जामीन नामंजूर करण्यात येईल अशा कडक व अटी शर्ती हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. अमित लुंकड यांच्या वतीने अॅड. सुधीर शहा, अॅड. जितेंद्र सावंत, अॅड. राहुल भरेकर यांनी काम पाहताना जामीन देण्याची मागणी केली.