Uncategorized

इंडिया बुल्स फायनान्सला कर्जदारांचा ४ कोटींचा गंडा

Pudhari News

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

इंडिया बुल्स फायनान्स कंपनीकडून कर्ज घेत त्यातील काही रकमेची परतफेड न करता कंपनीची तब्बल 4 कोटी 49 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून दादर पोलीस तपास करत आहेत.

इंडिया बुल्स  फायनान्स कंपनीचे एल्फीस्टन रोड येथे कार्यालय आहे. काही बांधकाम कंपन्यांचे संचालक हे मे 2017 मध्ये कंपनीच्या कार्यालयात गेले. त्यांनी ठाण्यातील निवासी प्रकल्पासाठी हाउसिंग लोनची मागणी केली. त्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या असून मालमत्तेवर कर्जबोजा नसून त्या कायदेशीर व विक्रीलायक असल्याचे सांगितले. प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी अशा एकूण 35 कोटी रुपये खर्चाची मागणी केली.

कंपनीचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी 300 कोटींचा व्यवसाय होणार असून त्यातून 2 कोटी 37 लाख रुपये मासिक उत्पन्न जमा होईल आणि कर्जाचे मासिक हप्ते वेळेवर फेडले जातील अशी हमी दिली. इंडिया बुल्सकडून रुपये 32 कोटी कर्ज मंजुर करण्यात आले. यासाठी बांधकाम प्रकल्पातील एकूण 193 फ्लॅटपैकी न विकलेल्या 73 फ्लॅटचे गहाणखत करण्यात आले. 36 महिन्यांसाठी कर्जाचा मासिक हफ्ता 1 कोटी 28 लाख 18 हजार 619 रुपये निश्चित केला. कर्जदारांनी डिसेंबर 2019 पासून कर्जाचे हप्ते भरणे बंद केले. चौकशीमध्ये कंपनीला गहाण ठेवलेल्या फ्लॅटपैकी पाच फ्लॅट परस्पर विकल्याचे उघड झाले. कर्जदारांनी मुद्दल 24 कोटी 12 लाख 9 हजार 470 रुपये आणि व्याज 7 कोटी 94 लाख 84 हजार 561 रुपये असे एकूण 32 कोटी 6 लाख 94 हजार 31 रुपये रक्कम कंपनीला परत केली. मात्र कर्ज व व्याज मिळून 10 कोटी 70 लाख 5 हजार 50 रुपये रक्कम भरली.

 

SCROLL FOR NEXT