Uncategorized

टीसीचा कोट घालून लुटणाऱ्याचा प्रवाशामुळे पर्दाफाश

Pudhari News

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : चोऱ्या, वाटमाऱ्या, लुटमार करण्यात पारंगत असलेल्या एका सराईत बदमाशाचा बुरखा प्रवाशाच्या सतर्कतेमुळे फाटला. या सराईत गुन्हेगारावर सात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या नोंदी असल्याचेही उघडकीस आले आहे. जागरूक प्रवाशाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वेच्या तिकीट तपासणीसाचा कोट घालून कोरोना टेस्ट अहवालाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या या भामट्याला पकडण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. 

अशिष सोनावणे असे या बोगस टीसीचे नाव आहे. तो कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात असलेल्या शिवाजी कॉलनीत राहणारा आहे.

कल्याणमध्ये राहणारे कुमार जाधव हे आपल्या कुटुंबासह आपल्या मूळ गावी परभणीला चालले होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांना ट्रेन पकडायची होती. कल्याण स्टेशनच्या फलाट नंबर चारवर ट्रेनच्या प्रतीक्षेत उभे असताना त्यांच्याजवळ एक टीसी आला. त्याने तिकीट विचारले. कुमार जाधव यांनी या टीसीला तिकीट दाखवले. मात्र तुमच्या पत्नीच्या अँटीजेन्ट टेस्ट रिपोर्ट नसल्याने तुम्हाला ३०० रूपये दंड भरावा लागेल, असे या टीसीने दरडावले. 

मात्र या टीसीचे हावभाव पाहून कुमार जाधव यांना शंका आली. त्यांनी त्वरित ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर कल्याणच्या रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी या टीसीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान हा भामटा रेल्वेचा बोगस तिकीट तपासणीस असल्याचे समोर आले. एवढेच नाही तर हा भामटा लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याचे ओळखपत्र वापरत असल्याचे समोर आले आहे. 

या बदमाशाच्या विरोधात सुरत पोलिस ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. अंगझडती दरम्यान त्याच्याकडे एक ओळखपत्र सापडले. हे ओळखपत्र त्याच्या एका मित्राचे आहे. हा मित्र कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलचा कर्मचारी आहे. घराबाहेर पडण्यासाठी हा भामटा याच ओळखपत्राचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गेल्या एक महिन्यात अशा ३ बनावट टीसींना बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणी माहिती देताना कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाल्मीक शार्दुल यांनी सांगितले, अटक आरोपी आशिष हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने याआधी आणखी किती प्रवाश्यांना गंडा घातला आहे, याचा चौकस तपास सुरू आहे. रेल्वे पोलिस ठाण्यात त्याच्यावर याआधी देखील एक गुन्हा दाखल असल्याचे ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT