Uncategorized

वारकर्‍यांनो, नका जाऊ पंढरी, गावातच करा ‘वारी’! 

Pudhari News

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

पंढरपूरच्या आषाढी वारीला बेळगाव जिल्ह्यातील वारकरी मंडळीनी दिंडीने जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील दिंड्यांना पंढरपुरात बंदी असल्याचा आदेश सोलापूर जिल्हाधिकार्‍यांनी काढला आहे. बेळगाव जिल्हाधिकार्‍यांनी तसे आपल्या आवाहनात म्हटले आहे. 

प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हाधिकार्‍यांनी 11 ते 24 जुलै दरम्यान आषाढी एकादशीनिमित्त होणार्‍या पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी बेळगाव जिल्ह्यातील भक्तांना बंदी घातली आहे. पंढरपूर भागातही या काळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आषाढी एकादशीनिमित्त बेळगाव जिल्ह्यातून चालत तसेच बस, रेल्वे आणि खासगी वाहनांतून हजारो वारकरी जातात. यावर आता बंदी घालण्यात आली आहे. या यात्रेसाठी भक्तांनी जाऊ नये, असेही आवाहन जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी केले आहे.

यंदा आषाढी एकादशी 24 जुलैरोजी आहे. बेळगाव जिल्ह्यातून दरवर्षी किमान पाच दिंड्या आळंदी आणि देहूहून पंढरपूरला जातात, तर एकादशीच्या आठ दिवस आधी हजारो भक्त खासगी वाहने आणि रेल्वेतून पंढरपूर गाठतात. मात्र, गेल्या वर्षीपासून वारीत खंड पडला आहे. यंदाही वारी खंडितच राहणार असून, बेळगाव जिल्ह्यातील भक्तांना पंढरपूरला प्रवेश नसल्याचे सोलापूर जिल्हाधिकार्‍यांनी कळवले आहे. 

सोलापूर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा हवाला देऊन बेळगाव जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी बेळगावातील भक्तांना यंदा पंढरपूरला न जाण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर वारीला जाता येईल, असे त्यांनी म्हटले आहे. 

कर्नाटक – महाराष्ट्र बससेवा बंद

बेळगाव : गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्रात जाणार्‍या सर्व बस बंद करण्यात आल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातून रोज 450 बसची महाराष्ट्रात सेवा सुरू होती. कर्नाटकमध्ये प्रवेश करणार्‍यांकडून आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आल्याने राज्य परिवहन कार्यालयाच्या बेळगाव शाखेने बससेवाच बंद केली. सोमवारी सांगली आणि कोल्हापूरसाठी बस सेवा सुरू होती. मंगळवारपासून ही सेवाही बंद करण्यात आली आहे.  बेळगाव जिल्ह्यातून महाराष्ट्रात 450 बस जात होत्या. यातील 50 टक्के बस आता कर्नाटकच्या सीमेपर्यंत जात आहेत. शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत महाराष्ट्रातील बससेवा बंद राहणार असल्याची माहिती बेळगाव परिवहनचे नियंत्रक एम. आर. मुंजी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT