करमाळा ः प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकरी उसाच्या पिकासोबतच केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत आहे. या केळीची निर्यात इराक-इराण या देशात केली जात आहे. उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रात मौजे कंदर, वांगी, चिखलठाण, बिटरगाव (वां), कुगाव, वाशिंबे, केत्तूर, पारेवाडी, पोमलवाडी, सोगाव, हिंगणी, टाकळी, कोंढार चिंचोली, कात्रज, खातगाव, उमरड आदी गावांत असून उजनी धरण पात्रावरुन पाईपलाईनद्वारे पाणी आपल्या शेतावर आणण्याचे काम तालुक्यातील 25 गावांमध्ये शेतकर्यांनी केलेले आहे.
या भागातील शेतकर्यांनी उसाला पर्यायी पीक म्हणून केळीचे पीक घेत आहेत. उसाच्या गाळपासाठी शेतकर्याला प्रत्येक वर्षी कारखान्याचे उंबरठे झिजवावे लागतात. उसाला योग्य भावही मिळत नाही तसेच उसाचे बिल वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकर्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. उसाला पर्याय म्हणून केळीचे उत्पादन घेण्याकडे या भागातील शेतकरी वळत आहे. सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस झाला तरी पुणे जिल्ह्यामध्ये पडणार्या पावसातून उजनीचे धरण 100 टक्के भरते.
त्या जोरावर उजनीच्या पट्ट्यात शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन सुरु केले आहे. तालुक्यातून दररोज 50 ते 60 कंटेनर केळी विक्रीसाठी बाहेर जात आहेत. त्यामुळे ऊस पिकविणारा पट्टा आता केळीचा पट्टा म्हणून नावारुपाला येऊ पाहत आहे. करमाळा तालुक्यातून इराण, इराक, रशिया, जपान, इटली, कुवेत या आखाती देशासह मुंबई, पुणे, हरियाणा, दिल्ली या शहरात केळी निर्यात सध्या सुरु आहे. विशिष्ट आकार व चवीची केळी उत्पादीत होत असल्याने येथील केळीला मागणी आहे. ही केळी बाराही महिने चालणारे फळ असल्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
करमाळा तालुक्यातील केळी परदेशात मुंबई येथील जे.एन.पी.टी.तून जहाजाने जातात. केळीच्या मार्केटींगसाठी बाहेरच्या व्यापार्यांसह गावागावातून एजंट निर्माण झालेले आहेत. त्यातून रोजगार निर्माण झालेला आहे.
तालुक्यात केळीच्या क्षेत्रात वाढ
वाशिंबे, ता. करमाळा येथे केळीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून वाशिंबे शिवारात चारशे एकर क्षेत्रात केळीच्या बागा उभ्या आहेत. शंकर निवृत्ती झोळ यांची केळी मलेशिया, इराण येथे निर्यात झालेली आहे. 3 एकरात 100 टन उत्पादन घेतल्याने युवराज झोळ, संजय शिंदे, रणजित शिंदे यासारखे युवा शेतकरी केळी पिकाकडे वळत आहेत.
तरूण शेतकर्यांचे आकर्षण
तालुक्यात सर्वप्रथम कंदरच्या शेतकर्यांनी उसाला ब्रेक देऊन केळी पिकाची लागवड केली. यातून निर्यातक्षम केळी तयार करुन त्याची परदेशात विक्री केली. ऊसापेक्षा जास्त पैसा केळी पिकातून मिळू लागल्याने तरुण शेतकरी केळीच्या पिकाकडे वळू लागला आहे.