पुढारी ऑनलाईन
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र 'दर्पण' हे बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनही आहे. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. बाळशास्त्री हे इंग्रजी राजवटीतील एक विद्वान व्यक्तिमत्त्व म्हणून विख्यात होते.
गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी 'दर्पण'चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने 'दर्पण' आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी इंग्रजी सत्ताधार्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी 'दर्पण'मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.
वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने 'दर्पण'ला सुरुवातीला मोठ्या संख्येने र्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. जुलै 1840 मध्ये 'दर्पण'चा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
मराठी पत्रकारितेची परंपरा
मराठी पत्रकारितेची महान परंपरा बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खाडिलकर, महाजनी, पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव, आचार्य अत्रे यांच्यापासून सुरू झालेली आहे. त्या काळातली छपाईची अपुरी साधने, त्या काळातल्या वृत्तपत्रांच्या संकल्पना, छपाईच्या क्षेत्रात आज जी उत्तुंग झेप घेतली गेली आहे, तशी कोणतीही व्यवस्था नसताना आणि दोन पैसे फायदा मिळवून 'या व्यवसायाचा धंदा न करता केलेली पत्रकारिता' हे मराठी पत्रकारितेचे खरे कूळ आहे.
बाबासाहेबांचा 'मूकनायक' किंवा 'बहिष्कृत भारत', टिळकांचा 'केसरी', मराठी भाषेत नसला तरी 'हरिजन' आणि 'यंग इंडिया' ही महात्माजींची वृत्तपत्रे एका धोरणाभोवतीच सर्वस्व पणाला लावून काम करत होती. मराठी पत्रकारितेचे हे प्रभावी कूळ आहे. आज मराठी पत्रकारिता नव्या दिशेने जात आहे. अनेक नवे प्रवाह यामध्ये सामील झाले आहेत. त्याचबरोबर बदलत्या काळात काही आव्हानेही उभी राहिली आहेत. त्यांचा सामना येणार्या काळात करावा लागणार आहे.