Uncategorized

औरंगाबाद : नायलॉन मांज्यामुळे तरुणाचा गळा आठ इंच कापला

निलेश पोतदार

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : जेवणाचा डबा आणण्यासाठी बेगमपुऱ्यातून विद्यापीठाकडे जात असताना एका महाविद्यालयीन तरुणाच्या गळ्याला नायलॉन मांजाने कापल्याची घटना (शुक्रवार) सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मांज्यामुळे तरुणाचा गळा सात ते आठ इंच कापला गेला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. चैतन्य शंकर मुंढे (वय 19 रा. बेगमपुरा) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, चैतन्य हा मुळचा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी आहे. तो औरंगाबादेत मामाकडे मुक्कामी असून, तो नीटची तयारी करत आहे. तो शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास जेवणाचा डबा आणण्यासाठी बेगमपुऱ्यातून विद्यापीठ गेटकडे दुचाकीवरून जात होता. अचानक विद्यापीठ गेटजवळ त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा लागला आणि यात त्याचा सात ते आठ इंच गळा कापला गेला. त्याने तात्काळ दुचाकी थांबवून पाहिले असता, पतंग उडवणारी मुलं तेथून निघून गेली.
त्‍याने त्याच्या गळ्याला हात लावून पाहिला असता, त्‍याला जखम झाल्‍याचे दिसून आले. सुदैवाने दुचाकीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान त्याने तात्काळ ही बाब मामाला कळवल्यानंतर त्याचे मामा सुदर्शन लटपटे यांनी त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्‍याला घरी सोडण्यात आले आहे.

थोडक्यात बचावलो…

त्या भागात अनेक मुले पतंग उडवत होती. त्यापैकी एकाच्या मांज्याने माझा गळा कापला गेला. दुचाकीचा वेग कमी असल्याने मी थोडक्यात बचावलो. मी जखमी झाल्याचे पाहून पतंग उडवणारी मुले तेथून निघून गेली.

-चैतन्य शंकर मुंढे

SCROLL FOR NEXT