Uncategorized

38 कि. मी. अंतरावर तब्बल 10 उड्डाणपूल

backup backup

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा भारतमाला योजनेंतर्गत बनविण्यात आलेल्या सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दहा उड्डाणपूल असून त्यातील नऊ उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे जड वाहनांसह बाहेरून येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांची चांगली सोय झाली आहे. तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीला सुरुवात झाली. कोरोना महामारीत करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये रस्त्याचे काम गतीने पूर्ण झाले. या मार्गावर चन्नवीर शिवाचार्य महास्वामी होटगी मठ, मल्लिकार्जुन नगर, गोदुताई परुळेकर विडी घरकुल, कुंभारी, तोगराळी, लिंबीचिंचोळी, वळसंग, कर्जाळ, कोन्हळ्ळी, अक्कलकोट बायपास अशा तब्बल 10 ठिकाणे उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत.

त्यातील नऊ उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे. आता फक्त चन्नवीर शिवाचार्य महास्वामी होटगी मठ सोलापूर येथील काम अंतिम टप्प्यात असून महिन्या-दोन महिन्याच्या कालावधीत या उड्डाणपुलावरूनही वाहतूक सुरू होणार आहे.
मल्लिकार्जुन नगर येथील उड्डाणपुलावरून वाहतुकीला पाच दिवसापासून सुरुवात झाली आहे. यामुळे मल्लिकार्जुन नगर, संगमेश्वर नगर, जंगम वस्ती, इस्कॉन टेम्पल,आसारामबापू आश्रम येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे आता नऊ उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने कोंडी थांबली आहे.

अक्कलकोट येथे कलबुर्गी व गाणगापूरकडे जाण्यासाठी जड वाहनांना सात किलोमीटर अंतराचे बाह्यवळण रस्ता करण्यात आला आहे. यामुळे अक्कलकोट शहरात होणारी वाहतूककोंडी थांबली आहे. याशिवाय हा राष्ट्रीय महामार्ग मराठवाडा, कर्नाटक, कोकण, पुणे आणि आंध्रप्रदेशला जोडणारा दुवा मानला जातो. यामुळे आंध्रप्रदेश, मराठवाडा, कर्नाटकातून येणार्‍या वाहनचालकांची चांगलीच सोय झाली आहे.

विकासामध्ये रस्त्यांचा मोठा वाटा असतो. सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गामुळे विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत. उड्डाणपुलामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी मदत झाली.
– रमेश परशेट्टी,
व्यवसायिक, चपळगाववाडी

सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे वाहनधारकांची चांगली सोय झाली आहे. यामुळे महामार्गाच्या टप्प्यात असलेल्या ग्रामस्थांना फायदा होत आहे. जलद गतीने वाहतूक होण्यास मदत होत आहे.
– ऋषिकेश उपासे,
उद्योजक, कुंभारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT