Uncategorized

नगर : 32 पाहुण्यांचा मुख्यालयातून पाय निघेना !

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेत सेवावर्ग म्हणून आलेल्या 32 पाहुण्या कर्मचार्‍यांचा प्रशासकीय मुक्काम वर्ष उलटले तरी अद्याप मुख्यालयात कायम आहे. संबंधित कर्मचार्‍यांचे 'काम इकडे, अन पगार तिकडे', या प्रकारामुळे मूळ नियुक्तीच्या ठिकाणी अन्य कर्मचार्‍यांवरच अतिरीक्त कामाचा भार पडत आहे. त्यातून जनतेची देखील नाहक ससेहोलपट सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर हे सेवावर्ग कर्मचार्‍यांना मूळ जागेवर पाठविण्याबाबत काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

पदाधिकार्‍यांच्या आग्रहास्तव जिल्हा परिषदेत काही कर्मचार्‍यांना सेवावर्ग म्हणून मुख्यालयात वेगवेगळ्या टेबलवर बसविण्यात आले होते. संबंधित 32 कर्मचारी हे मुख्यालयातील विविध विभागात काम करत आहेत. मात्र, सेवावर्ग करताना विभागीय आयुक्तांची आवश्यक परवानगी आहे की नाही, याविषयीही साशंकता व्यक्त केली जात आहे. आता पदाधिकारी कालावधी मार्चमध्येच संपला, तरीही संबंधित कर्मचारी अद्यापही मुख्यालयातच आहेत. संबंधित कर्मचार्‍यांची मूळ नियुक्ती ही अन्य तालुक्यात, पंचायत समितीत असताना ते कर्मचारी मुख्यालयात आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती ज्या पदावर आहे, त्या ठिकाणची कामे रेेंगाळल्याचे समजते. तत्कालिन काही पदाधिकार्‍यांनीही सेवावर्ग पुन्हा मूळ जागेवर पाठवावे, यासाठी आवाज उठविला होता. परंतु, अद्यापतरी सेवावर्ग हटविणे प्रशासनाला शक्य झालेले नाही. त्यामुळे आता प्रशासक असलेले सीईओ येरेकर हे याबाबत निर्णय घेणार का, याकडे लक्ष असणार आहे.

अनेकजण त्याच टेबलवर तळ ठोकून

काही कर्मचार्‍यांचे स्थानांतरण झालेले आहे, काहींच्या प्रशासकीय बदल्या झालेल्या आहेत. मात्र आजही काही कर्मचारी मुख्यालयात तळ ठोकून आहेत. यात काहींचे स्थानांतरण एका विभागात, तर सध्या कामकाज दुसर्‍या विभागात सुरू असल्याचेही दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT