Uncategorized

रेल्वेच्या धडकेत 3 मजूर ठार, 1 गंभीर

Shambhuraj Pachindre

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा रात्री दारू पिऊन रेल्वे रूळावर नशेत झोपी गेलेल्या चार मजुरांना मिरजहून कुर्डूवाडीकडे जाणार्‍या मालवाहतूक रेल्वे गाडीने धडक दिली. या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य एक गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे पंढरपूरजवळ घडली. चौघेही छत्तीसगढ राज्यातील मजूर आहेत. या अपघातात हेमंत गोविंद ठाकूर (वय 20), पंकज चरण भिवरी (20), सोनू तुकाराम यादव (18, सर्व रा. छत्तीसगड) हे तीघे ठार झाले. तर गोकुळ फुलसिंग भिवरी (20) हा जखमी झाला आहे.

याबाबत रेल्वे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, छत्तीसगड राज्यातील चार मजूर पंढरपूर येथे कामानिमित्त आले आहेत. हे सर्वजण बांधकाम मजूर असून ठाकरे चौक येथे एका खासगी बंगल्यात वास्तव्य करीत होते. बुधवारी कामाला सुट्टी असल्याने हे मजूर मंगळवारी रात्री पंढरपूर ते टाकळी दरम्यानच्या रेल्वे पुलावरील ट्रॅकवर दारू पार्टी करीत बसले होते. पहाटे चार वाजता रेल्वे आली. मात्र, या चार जणांना दारूच्या नशेत रेल्वे आल्याचे समजले नाही. रेल्वे खाली सापडून दोघे जण जागीच ठार झाले. तर दोघे बाजूला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. दोन गंभीरपैकी एकाचा मृत्यू झाला तर चौथा गंभीर जखमी मजूर गोकूळ भिवरी याच्यावर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भिवरी हा शुध्दीवर आला आहे.

दरम्यान, रेल्वेची धडक इतकी जोरात होती की, यात दोघांच्या शरीराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. धड शरीरापासून वेगळे झाले आहेत, तर हात, पाय तुटून इतरत्र पडले. सर्वत्र रक्ताचा सडा पडल्याचे दिसून येत होते. पहाटे झालेली घटना सकाळी स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. याबाबतचा अधिक तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.

कोणत्या गाडीच्या वेळी घटना घडली ते कळेना

रात्रीच्या वेळी मिरज ते कुर्डूवाडी, कुर्डुवाडी ते मिरज अशा 7 धावत्या रेल्वे गाड्या आहेत. त्यामुळे ही घटना मालगाडी की प्रवासी गाडीच्यावेळी घडली याबाबत सांगता येत नाही. मात्र, पहाटे 5 वाजता एका रेल्वे चालकाकडून पंढरपूरजवळ दोन लोक ट्रॅकवर पडल्याचे अन्य चालकाला सांगण्यात आलेे. अधिक तपास सुरू असून जखमींकडून याबाबत माहिती मिळवण्यात येत असल्याचे रेल्वेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चिटणीस यांनी सांगीतले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT