Uncategorized

पोहेगावात एटीएम फोडून 11 लाखांची चोरी

अमृता चौगुले

पोहेगाव : पुढारी वत्तसेवा :  इंडियन ओव्हरसीज बँकेचे येथील 'एटीएम' कटरच्या साह्याने फोडून चोरट्यांनी 10 लाख 83 हजार 700 रुपयांवर डल्ला मारला. सहा महिन्यांपूर्वीही चोरट्यांनी हेच एटीएम चोरून नेले होते. मात्र त्या वेळी ते चोरांना फोडला आले नव्हते. मंगळवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास ही चोरी झाली. बँकेशेजारी असलेले जय भद्रा फिटनेस क्लबचे व्यवस्थापक राजेंद्र रोहमारे व बाबासाहेब घेर क्लब सुरू करण्यासाठी पहाटे आले, त्या वेळी त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ बँकेचे शाखा व्यवस्थापक बी. डी. कोरडे, बाबासाहेब खंडीझोड यांना फोन करून माहिती दिली. व्यवस्थापक व प्रशासकीय अधिकारी तातडीने दाखल झाले व त्यांनी शिर्डी पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ व पथक पोहेगावात दाखल झाले.

चोरट्यांनी एटीएम कटरच्या साह्याने तोडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अशाच पद्धतीने तळेगाव (ता. संगमनेर) येथेही एटीएम फोडल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी नऊ वाजता श्वानपथकही दाखल झाले. दरम्यान, निरीक्षक शिरसाठ यांनी सांगितले, की मध्यरात्रीनंतर दोन वाजता शिर्डी पोलिसांच्या गस्तीपथकाचे वाहन पोहेगाव येथून पुढे गेल्यानंतर ही घटना घडली असावी. दरम्यान, पोहेगावात एटीएम फोडण्याचा आतापर्यंत पाच घटना घडल्या आहेत.

पोलिस दूरक्षेत्र पाच वर्षांपासून बंद
पोहेगाव पोलिस दूरक्षेत्र गेल्या पाच वर्षांपासून बंद असल्याने या घटना घडत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. दूरक्षेत्र सुरू करण्यासाठी वेळोवेळी आंदोलने, उपोषणे करण्यात आली; मात्र पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळेच अशा घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आता तरी शिर्डी पोलिस ठाण्याचे दूरक्षेत्र सुरू करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

SCROLL FOR NEXT