कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या वाट्याच्या या जागेविषयी अनेकांच्या भुवया ताणल्या होत्या. त्यालाही उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम देताना कोल्हापूरच्या जागेवर पाणी सोडण्याची तयारी दाखविली. तथापि, या जागेच्या बदल्यात कोल्हापूर उत्तर आणि राधानगरी हे दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे विधानसभेसाठी शिवेसना विरुद्ध शिवसेना हा सामना कोल्हापूरकरांना पाहावयास मिळू शकतो.
लोकसभेच्या जागावाटपामध्ये महाविकास आघाडी अंतर्गत जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले हे दोन मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले. गत लोकसभा निवडणुकीत या दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. राज्याच्या सत्तेच्या नाट्यपूर्ण घडामोडीत या दोन्ही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणे पसंत केले. यापैकी कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडून उद्धव ठाकरे यांनी संजयकाका पाटील यांच्या विरोधात सेनेचे मल्ल चंद्रहार पाटील यांना सांगलीच्या मैदानात उतरविले.
आता हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा हवा. पण ते महाविकास आघाडीत दाखल होण्यास तयार नाहीत, असा पेच निर्माण झाल्यामुळे शिवसेनेचीही महाविकास आघाडीअंतर्गत कुचंबणा झाली आहे. शेट्टींना पाठिंब्याची भूमिका घेतली, तर राज्यभरातील महाविकास आघाडीत वाद निर्माण होऊ शकतो. यामुळेच ठाकरे शेट्टी यांना आघाडीत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण त्याला यश मिळाले नाही, तर अंतिम क्षणी शिवसेना उमेदवार रिंगणात उतरवू शकते, असे खात्रीलायक वृत्त आहे. यासाठी शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर व वडगावचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे.
विधानसभेच्या रिंगणातही कोल्हापूरची जागा दीर्घकाळ शिवसेनेच्या ताब्यात होती. गतनिवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांनी राजेश क्षीरसागर यांचा पराभव करून सेनेची परंपरा खंडित केली. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव काँग्रेसच्या आमदार झाल्या. आता ही जागा शिवसेना परत मिळविण्याच्या हालचाली करत आहे. लोकसभेचा मतदारसंघ सोडतानाच हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार विधासभेचे समीकरण जुळले, तर कोल्हापुरात सेनेच्या दोन वाघांमधील लढत पाहण्याची संधी कोल्हापूरकरांना आहे. विशेष म्हणजे यातील एका वाघाच्या पाठीवर भाजपचे कमळ असेल, तर दुसर्या वाघाच्या पाठीवर काँग्रेसचा तिरंगा असणार आहे.
शिवसेनेचे मनसुबे यशस्वी होणार का?
राधानगरी विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आबिटकर सेनेच्या तिकिटावर विधानसभेत पोहोचले. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे बोट पकडल्यानंतर पक्की बांधणी असलेल्या या मतदारसंघातही शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. मात्र तिकीट वाटपात दोन विधानसभा मतदारसंघाच्या जागा ताब्यात घेण्याचे शिवसेनेचे मनसुबे यशस्वी होणे आवश्यक आहे.