मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागा लढविण्याच्या तयारीला लागा, अशी सूचना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेते, पदाधिकार्यांना केल्या आहेत.
मातोश्रीवर सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. मंगळवारी नेते, उपनेते, आमदारांच्या बैठकीनंतर बुधवारी माजी आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थितीचा आढावा घेतानाच पक्षवाढीची चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या. महाविकास आघाडीत आपल्याला संधी आणि वाव आहे. त्यामुळे जागा मिळणार की नाही याची चिंता करू नका. सर्व 48 जागांवर तयारीला लागा. कुणाला कुठली जागा मिळणार याचा विचार तुम्ही करू नका. त्याची चिंता माझ्यावर सोडा, असे ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.