Latest

राज्यात 18 ठिकाणी उद्योग भवन उभारणार : उदय सामंत

दिनेश चोरगे

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक होऊन राज्य प्रथम क्रमांकावर आले आहे. राज्यात 18 ठिकाणी उद्योग भवन उभारण्यात येत आहेत. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याचा यात समावेश आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून कर्ज घेणार्‍या तरुणांना 35 टक्के अनुदान दिले जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

येथील उद्योग भवनाचे भूमिपूजन उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, अतिरिक्त विकास आयुक्त शनमुगराजन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उद्योग सहसचिव संजय देगावकर, एमआयडीसीचे मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, अधीक्षक अभियंता कालिदास भांडेकर, अतिरिक्त उद्योग संचालक संजय कोरबू, उद्योग सहसंचालक विजू सिरसाठ उपस्थित होते.

उद्योग मंत्री ना. सामंत म्हणाले की, मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त राज्यात उद्योग भवन उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला होता. त्यातील पहिला उद्योग भवनाचे भूमिपूजन होत आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यासह अशी 18 उद्योग भवन उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून या पूर्वी वर्षाला 5 हजार 16 उद्योजक बनविण्याचे उद्दिष्ट होते. 13 हजार 526 उद्योजक राज्यात यावर्षी उभे करू शकलो. शहर अथवा ग्रामीण भागातील कोणत्याही युवक, युवतीला उद्योगासाठी 35 टक्के सबसीडी दिली जाईल. बँकांनी अशी कर्ज प्रकरणे आपल्या घरातीलच आहेत, असे समजून संवेदनशीलतेने 100 टक्के मंजूर करावीत.

गेल्या 15 वर्षात उद्योग मित्र समिती स्थापन झाली नव्हती. पक्ष कुठला आहे, याचे देणं घेणं नाही. उद्योगवाढीसाठी सर्वांना घेऊन जिल्हा उद्योग मित्र समिती स्थापन केली आहे. या समितीच्या बैठका सातत्याने झाल्या पाहिजेत. उद्योग वाढीसाठी ज्या ज्या सूचना असतील त्या या मधून आल्या पाहिजेत, असेही उद्योगमंत्री सामंत म्हणाले. यावेळी जिल्हा उद्योग मित्र समितीच्या सदस्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विकास आयुक्त श्री. कुशवाह म्हणाले, सर्व प्रकारच्या सेवा सुविधा अशा उद्योग भवनाच्या माध्यमातून दिल्या जातील, अशी माहिती ना. सामंत यांनी यावेळी दिली. पायाभूत सुविधांचा विकास करणे, निर्यातील प्रोत्साहनपर आवश्यक निर्णय घेणे, एक खिडकी योजनेतून सुविधा देणे यासाठी उद्योग मित्र कायदा झाला. अशा उद्योग भवनाच्या माध्यमातून या सेवा देण्यात येणार आहेत. जिल्हा उद्योग मित्र समितीचे सदस्य प्रशांत पटवर्धन यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करुन मैत्री कायदा फायदेशीर असल्याबाबत मत मांडले. शेवटी श्रीमती सिरसाठ यांनी आभार प्रदर्शन केले. असे असेल उद्योग भवन तळमजला अधिक सहा मजले, एकूण बांधकाम क्षेत्रफळ 74 हजार 310 चौ. फूट इमारतीचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून, त्यासाठी सुमारे 38 कोटी खर्च येणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT