Latest

U19 World Cup 2022 : पाचव्या विश्वविजेतेपदासाठी भारत सज्ज, आज इंग्लंडविरुद्ध फायनल

Arun Patil

नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) ; वृत्तसंस्था : गेल्या 14 सत्रांत आठवेळा फायनल खेळून चारवेळा जेतेपद मिळवणारा भारताचा 19 वर्षांखालील (U19 World Cup 2022) क्रिकेट संघ स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. इंग्लंडविरुद्ध शनिवारी (दि.5) होणार्‍या फायनलमध्ये यश धूलचा संघ आपला हा फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. भारताचे लक्ष विक्रमी पाचव्या विजेतेपदावर आहे आणि सध्याचा फॉर्म पाहता ते कठीणदेखील दिसत नाही. दुसरीकडे 1998 नंतर दुसर्‍यांदा अंतिम फेरीत पोहोचलेला इंग्लंडचा संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि त्यामुळे दोन्ही संघांत चांगली चुरस पाहायला मिळेल.

मैदानाबाहेर कोरोना प्रादुर्भावाचा सामना केल्यानंतरदेखील भारताला अंतिम फेरी गाठताना अडचण आली नाही. कर्णधार धूल आणि उपकर्णधार एस. के. रशीद यांना संक्रमणामुळे तीनपैकी दोन सामने खेळता आले नाहीत. धूलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यफेरीत शतक झळकावले, तर रशीदने 95 धावांची खेळी केली. (U19 World Cup 2022)

सलामी फलंदाज अंगक्रिश रघुवंशी आणि हरनूर सिंह यांना उपांत्य सामन्यात चमक दाखविता आली नाही. यावेळी त्यांचा प्रयत्न चांगल्या कामगिरीचा असणार आहे. अंतिम सामन्यात आपल्या कामगिरीच्या जोरावर खेळाडू आयपीएल लिलावापूर्वी संघाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्नदेखील करतील.

स्पर्धेत फलंदाजांची वैयक्तिक कामगिरी दिसली तरी गोलंदाजांनी सर्वांना प्रभावित केले. राजवर्धन हंगर्गेकर आणि रवी कुमार यांनी वरच्या फळीतील फलंदाजांना अडचणीत आणले, तर विकी ओस्तवालने फिरकी विभागात छाप पाडली. त्याने आतापर्यंत 12 विकेट मिळवल्या आहेत. 19 वर्षांखालील संघातील खेळाडूंना अनुभवी खेळाडूंकडून खूप काही शिकण्यास मिळत आहे. 2008 मध्ये 19 वर्षांखालील संघाचा विजेता कर्णधार विराट कोहलीने दबावात कशी कामगिरी करायची, याबाबत सल्ला दिला.

इंग्लंडचा संघ 1998 मध्ये फायनलमध्ये पोहोचला होता. त्यावेळी त्यांनी जेतेपद मिळवले होते. स्पर्धेत भारताप्रमाणे अपराजित राहिलेल्या टॉम प्रेस्टच्या संघाकडे चांगले खेळाडू आहेत. प्रेस्टने 292 धावा केल्या आहेत, तर जलदगती गोलंदाज जोशुआ बॉयडेनने 13 विकेट मिळवल्या आहेत. भारतीय फलंदाजांना स्पिनर रेहान अहमदविरुद्ध सांभाळून खेळावे लागेल.

सामन्याची वेळ : सायंकाळी 6.30 वा.

विराट कोहलीने वाढविला युवा संघाचा आत्मविश्वास

या मोठ्या सामन्यापूर्वी वरिष्ठ संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने युवा क्रिकेटपटूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांना काही टिप्सही दिल्या. विराटने त्याच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये भारताला अंडर-19 चॅम्पियन बनविले होते. कौशल तांबे आणि राजवर्धन हंगर्गेकर यांनी इन्स्टाग्राम स्टोरी म्हणून विराटसोबतच्या त्यांच्या संभाषणाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हंगर्गेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलेय की, विराट भैयासोबत संवाद साधून खूप आनंद झाला. तुमच्याकडून जीवन आणि क्रिकेटबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या; ज्या आम्हाला आगामी काळात सुधारण्यास मदत करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT