दि. 13 डिसेंबर, 2001 रोजी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी 5 जवानांसह 9 जण शहीद झाले, तर लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. 13 डिसेंबर, 2023 रोजी संसदेवरील हल्ल्याचा 22 वा स्मृतिदिन होता. नेमक्या याच दिवशी दोघा तरुणांनी संसदेतील सुरक्षा कवच भेदून लोकसभेतील सभागृहात अध्यक्षांच्या दालनात घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे नव्या संसदेतील सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले आहे. (Parliament Attack)
लोकसभेत एकच हलकल्लोळ उडाला. दोघा तरुणांनी प्रेक्षा गॅलरीतून सभागृहातील बाकांवर उड्या टाकल्या. त्यानंतर ते बाकांवरून उड्या मारत अध्यक्षांच्या चेंबरकडे जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यातील एकाने कॅनिस्टर्समधून पिवळा धूर उडवण्यास (स्प्रे) सुरुवात केली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधींसह अन्य खासदारही यावेळी उपस्थित होते. या प्रकारानंतर खासदारांनी दोघांना पकडून बेदम चोप दिला. खासदारांनी निर्भयपणे दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्यावेळी सुरक्षारक्षक काय करत होते, असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला. (Parliament Attack)
खलिस्तानी दहशतवादी पन्नू याने संसदेवर हल्ला करण्याची धमकी देणारा व्हिडीओ प्रसारित केला होता. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षेबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. तरीही संसदेतील सुरक्षेमध्ये त्रुटी असल्याचे समोर आले आहे. (Parliament Attack)
संसदेवर 13 डिसेंबर रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृती या घटनेने ताज्या झाल्या. त्या हल्ल्यात 9 जण शहीद झाले होते. यामध्ये संसदेचे दोन सुरक्षा सहायक जगदीश प्रसाद यादव आणि मतबरसिंग नेगी, दिल्ली पोलिसांचे पाच सुरक्षा कर्मचारी नानक चंद, रामपाल, ओमप्रकाश, बिजेंद्र सिंह आणि घनःश्याम, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी आणि सीपीडब्ल्यूडी कर्मचारी देशराज यांचा समावेश होता. या हल्ल्यात 16 जवान जखमी झाले होते. शहीद जवानांमध्ये जगदीश प्रसाद यादव, कमलेश कुमारी आणि मतबरसिंग नेगी यांना 'अशोकचक्र', नानक चंद, ओमप्रकाश, घनःश्याम, रामपाल आणि बिजेंद्र सिंह यांना 'कीर्तिचक्र'; तर संतोष कुमार, वाय. बी. थापा, श्यामबीर सिंग व सुखवेंद्र सिंग यांना 'शौर्यचक्र' प्रदान करण्यात आले होते. संसदेवरील हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर, कटकारस्थानी अफझल गुरू, एस. ए. आर. गिलानी, अफशान गुरू आणि शौकत हुसेन यांना अटक करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने गिलानी आणि अफशान यांना दोषमुक्त केले. अफझल गुरूची फाशीची शिक्षा मात्र कायम ठेवली. शौकत हुसेनची फाशीची शिक्षाही कमी करून 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 9 फेब्रुवारी 2013 रोजी अफझल गुरूला सकाळी 8 वाजता दिल्लीच्या तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली आणि तिथेच दफन करण्यात आले.
अभ्यागतांना पास हवा असल्यास खासदारांची शिफारस अथवा स्वाक्षरी लागते. म्हैसूर (कर्नाटक) मतदारसंघातील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी घुसखोर तरुणांना पास दिल्याचे निष्पन्न झाल्याचे बसपचे खासदार दानिश अली यांनी स्पष्ट केले.
सागर शर्मा (लखनौ), डी. मनोरंजन (बी.ई., म्हैसूर), अमोल शिंदे (वय25), नीलम या चौघांना अटक करण्यात आली असून, दोघांचा शोध सुरू आहे. गुरुग्राम या ठिकाणी सहा जणांनी संसदेत घुसण्याचे कारस्थान रचल्याचे उघड झाले आहे.
पिवळा धूर हा विषारी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये गुुंगीचे औषध असून, बेशुद्ध होण्याचा धोका संभवतो. संसदेच्या बाहेरही दोघांनी स्प्रेमधून धूर उडवून मोठमोठ्याने घोषणा देण्यास सुरुवात केली. हुकूमशाही चालणार नाही, भारतमाता की जय, जय भीम, जय भारत अशा घोषणा त्यांनी दिल्या. या घटनेतील चौघा तरुणांची सोशल साईटस्वरून एकमेकांची ओळखी झाली होती. त्यानंतर त्यांनी संसदेत घुसखोरी करण्याचे नियोजन केले होते. (Parliament Attack)