आळेफाटा (पुणे), पुढारी वृत्तसेवा: गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसे विक्री करण्यासाठी आळेफाटा परिसरात आलेल्या दोन जणांना आळेफाटा पोलिसांनी गजाआड केले. प्रवीण यमनाजी निचीत (वय ४५, रा. वडनेर खुर्द, ता. शिरूर) व सुरेश अरुमुगर मुपनार (वय ३८, रा. पिंपरी पेंढार) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.
पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेली माहिती अशी की, परिसरात बुधवारी (दि. १५) दुपारनंतर गावठी पिस्तूल विक्री करण्यास काही जण आळेफाटा परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर व सहायक फौजदार चंद्रशेखर डुंबरे यांना मिळाली. यानंतर पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, सहायक फौजदार चंद्रशेखर डुंबरे, पोलिस हवालदार भीमा लोंढे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, नवीन अरगडे, लहानू बांगर यांच्या पथकाने बसस्थानक व परिसरात सापळा लावला. पाच वाजेच्या सुमारास चौकापासून जवळच असलेल्या चहाच्या दुकानाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयितांना पोलिस पथकाने ताब्यात घेतले.
दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत नावे विचारले असता त्यांनी पिस्तूल हे विक्री करण्यासाठी आळेफाटा येथे आणले असल्याची कबुली दिली. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यातील प्रवीण निचीत हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी दोन्ही संशयितांविरोधात आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर हे करीत आहेत. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींनी आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरात काही गावठी कट्टे विकले आहेत का? याचा शोध घेण्याचे आवाहन आळेफाटा पोलिसासमोर असणार आहे.