पुणे, पुढारी वृत्तसेवा: खडकवासला येथील एनडीएच्या प्रतिबंधात्मक परिसरात प्रवेश करून चंदनाचे झाड कापून नेत चोरी करणार्या दोघांना उत्तमनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अक्षय सुदाम वाघमारे (19, रा. कोंढवे-धावडे) आणि बाबा रामा काटकर (35, रा. डोणजे ता. हवेली. जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत भगवान दारवटकर (55, रा. नांदेड ता. हवेेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्ट रोजी सकाळी खडकवासला येथील एनडीएच्या प्रतिबंधीत क्षेत्रातून चंदनाचे झाड कापून चोरी करून नेण्यात येत होते. याप्रकणात नुकताच उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपींचा शोध घेत असताना वाघमारे आणि काटकर यांच्याबाबत उत्तमनगर पोलिसांना माहीती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली.
यापूर्वी वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कंमांड हॉस्पीटलच्या मागे असलेल्या बंगला नंबर 5 मधील दोन चंदनाची झाडे चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार 5 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर दिलीप चव्हाण (62, रा. वानवडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.