Latest

 बारामती : कृष्णा पेट्रोलपंप व्यवस्थापकाला लुटण्याचा प्रयत्न करणारे दोघे जेरबंद

अमृता चौगुले
 बारामती : येथील  पाटस रस्त्यावरील कृष्णा पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकाला पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिस ठाण्याने संयुक्तपणे पकडले. त्यांचा एक साथीदार अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सोन्या उर्फ अभिषेक दत्तात्रय गावडे (रा. मेडद, ता. बारामती) व अक्षय बाळू दहिंजे (रा. सटवाजीनगर, बारामती) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
सोमवारी (दि. ७) येथील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मालकीचा पाटस रस्त्यावरील कृष्णा पेट्रोलपंपावरील व्यवस्थापक मयुर बाळासाहेब शिंदे (वय ३२) हे शनिवार व रविवारी पंपावर जमा झालेली रोकड घेवून ते बारामती सहाकरी बॅंकेत भरणा करण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून दोन अनोळखी तरुण तोंडाला मास्क लावून स्प्लेंडर गाडीवरून आले. त्यांनी शिंदे यांच्या दुचाकीला स्वतःची दुचाकी आडवी मारत थांबवले. त्यांच्याकडील  १ लाख ९९ हजार रुपयांची रोकड असलेली बॅग ते हिसकावू लागले. शिंदे यांनी यावेळी त्यांना जोरदार  प्रतिकार  केला.
त्यामुळे चिडलेल्या चोरट्यांनी त्यांच्याकडील पिस्तुल मुठीच्या बाजूने शिंदे यांच्या डोक्यात मारत बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु शर्थीने लढा देत शिंदे यांनी बॅग सोडली नाही. रस्त्याने ये-जा करणारे थांबू लागल्यामुळे हे चोरटे पाटस रस्त्याच्या बाजूने पळून गेले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जखमी शिंदे यांना उपचाराकामी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांकडून या घटनेचा तपास  केला जात होता. या तपासात बारामती तालुका, भिगवण, वडगाव निंबाळकर  या पोलिस ठाण्यांचे सहकार्य घेण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोघांना अटक  करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, वाहन व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांचा अन्य एक साथीदार अद्याप फरार असून पोलिसांकून त्याचा शोध सुरु आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे, सपोनि सचिन काळे, प्रकाश वाघमारे, सपोनि दिलीप पवार, सपोनि गंधारे, गावडे, उपनिरीक्षक अमित सिद पाटील, सहाय्यक फौजदार रवीराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, अभिजित  एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, राजू मोमीन, सागर क्षीरसागर, अजित भुजबळ,  विजय कांचन, अजय घुले,  बाळासाहेब खडके,  अतुल  डेरे, गुरु जाधव, रामदास बाबर, काशिनाथ राजापुरे यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे अक्षय सिताफ, मनोज पवार, सागर जामदार, दशरथ इंगोले, यशवंत पवार, सचिन कोकणे यांनी ही कामगिरी केली.
हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT