Latest

धक्कादायक: गेटच्या बाहेर गेलेला चेंडू घेऊन येतो म्हणत हडपसर निवारागृहातून पळाली दोन मुले

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पंधरा दिवसांपूर्वी निवारागृहातील अधिकार्‍यांना चकवा देत आणि सीसीटिव्ही कॅमेर्‍यावर आवरण टाकून पाच मुली पळून गेल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता हडपसर येथील मुलांच्या निवारागृहातून दोन मुले क्रिकेट खेळत असताना गेट बाहेरील चेंडू आणण्यासाठी गेल्यानंतर पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पळून गेलेली मुले ही अनुक्रमे तेरा आणि बारा वर्षाची आहेत. याबाबत संस्थेचे समन्वयक संजय शिरसाठ (38, रा. गंगानगर, सिध्दीविनायक कॉलनी, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे संजय शिरसाठ हे लातुर संचलित, श्री साई सेवाभावी संस्थेच्या मुलांच्या खुल्या निवारागृहाचे समन्वयक आहेत. दहा ते बारा दिवसांपूर्वी त्यांच्या संस्थेत दोन मुले दाखल झाली होती. त्यातील एक मुलगा आंध्रप्रदेशातील असून त्यांच्या घरची परिस्थिती ही गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याने आणि त्याला आईही नसल्याचे निवारागृहात दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्या समुपदेशनात समजले होते. त्याचे संगोपन त्याची आजी आंध्रप्रदेश येथे करत होती. परंतु, घरच्या वातावरणाला कंटाळून 13 वर्षाचा हा मुलगा रेल्वेने पुण्यात आला होता. तो भटकताना आढळल्यानंतर त्याला बाल कल्याण समिती समोर हजर केल्यानंतर हडपसर येथील निवारागृहात पाठविण्यात आले होते. तर दुसरा मुलगा हा 12 वर्षाचा असून 2 री नंतरच त्याने शिक्षण सोडले होते. त्याचे आई-वडील विभक्त राहत असल्याने त्याने घरातील परिस्थिती पाहून पुणे गाठले होते. रेल्वेस्थानक परिसरात त्याच्या बरोबर कोणी नसल्याचे आढळल्यानंतर त्यालाही बाल कल्याण समिती समोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्याला हडपसर येथील निवारागृहात पाठविण्यात आले होते.

दोघेही 12 दिवसांपूर्वी निवारागृहात दाखल झाले होते. निवारागृहात बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास मुले क्रिकेट खेळत होती. हे दोघेही तेव्हा त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळत होते. त्यावेळी चेंडू गेटच्या बाहेर गेल्यानंतर तेथील शिक्षक महिलेला या दोघांनी चेंडू घेऊन येतो सांगितले. परंतु, बराच वेळ वाट पाहूनही दोघे चेंडू घेऊन न परतल्याने त्यांचा शोध घेतला परंतु दोघेही सापडले नाहीत. त्यानंतर निवारागृहाचे समन्वयक शिरसाठ यांनी पोलिस ठाणे गाठून त्यांच्या बेपत्ता (अपहरण) होण्याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्या दोन मुलांचा शोध घेतला जात असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सौरभ माने करत आहेत.

चेंडू आणण्याच्या बहाण्याने बाहेर गेलेली दोन्ही मुले परराज्यातील आहेत. ही मुले रेल्वेस्थानक परिसरात सापडल्यानंतर त्यांना बाल कल्याण समितीसमोर हजर केल्यानंतर त्यांना आमच्या निवारागृहात पाठविण्यात आले होते. त्यातील आंध्रप्रदेश येथील मुलाच्या आजीशी आमचा संपर्क झाला होता. त्या पुण्याकडे निघाल्याही होत्या. त्यातच हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर लागलीच याबाबतची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे.
– संजय शिरसाठ, समन्वयक, निवारागृह श्री साई सेवाभावी संस्था, हडपसर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT