नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांमुळे जगातील काही गावे प्रकाशात आली आहेत. आपला देशही त्याला अपवाद नाही. केरळच्या मल्लापूरम जिल्ह्यातील कोडिन्ही हे असेच एक गाव. तेथे जुळ्या मुलांची संख्या रॉकेटच्या वेगाने वाढत चालली आहे. विशेष म्हणजे, यामागचे रहस्य नामवंत शास्त्रज्ञांनाही अजून उलगडलेले नाही.
जगात जन्मणार्या दर हजार मुलांपैकी नऊ मुले जुळी असतात आणि कोडिन्ही गावात जन्मणार्या दर हजार मुलांपैकी 45 मुले जुळी असतात. जगभरातील नामवंत शास्त्रज्ञांनी या गावाला भेट देऊन अमाप संशोधन या विषयावर केले आहे. मात्र, त्यांनादेखील हे कोडे सोडवता आलेले नाही. गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. 2008 साली या गावात जुळ्या मुलांची संख्या होती 280. सध्या ही संख्या 400 हून अधिक झाली आहे. जुळ्या मुलांच्या गावात तुमचे स्वागत आहे, असा फलक तुम्हाला कोडिन्हीच्या वेशीवरच पाहायला मिळेल. त्यामुळे उत्सुकतेपोटी जगभरातील अनेक जण आवर्जून या गावाला भेट देत आहेत. तीन पिढ्यांपासून कोडिन्हीत जुळी मुले जन्माला येत आहेत. ही संख्या प्रत्येक वर्षागणीक वाढतच चालली आहे. डॉ. कृष्णन श्रीबिजू अजूनही या रहस्याचा भेद करण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून कोडिन्हीमध्ये जुळ्या मुलांची संख्या दुप्पट होऊ लागल्यानंतर जगभरातील शास्त्रज्ञांचे कुतूहल चाळवले. 2016 मध्ये लंडन, जर्मनी आणि देशाच्या काही भागातील शास्त्रज्ञांनी या गावात तळ ठोकला होता. त्यांनी गावकर्यांच्या 'डीएनए'चे नमुने घेऊन त्यावर प्रचंड संशोधन केले. तथापि, त्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही.