Latest

रत्नागिरी : ‘कासव संवर्धन’ला तापमानवाढीचा फटका

दिनेश चोरगे

रत्नागिरी : जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असून गेल्या काही वर्षांत अंडी संवर्धनाचा कार्यक्रम वनविभाग व स्थानिक कासवमित्रांच्या सहकार्याने यशस्वीपणे सुरू आहे. यंदा या अंडी संवर्धनाला तीव्र उन्हाळ्याचा फटका बसला असून वाढत्या उष्णतेमुळे अंडी उबवून त्यातून पिल्ले बाहेर पडण्याच्या प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. उष्णतेमुळे अंडी खराब झाल्याने पन्नास टक्के पिल्लांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून आले आहे.

मागील दोन महिन्यात राज्याला वाढत्या उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी तपमान 38 ते 40 अंशाच्या पुढे गेले आहे. या तीव्र उन्हाचा परिणाम कोकण किनारपट्टीवरही दिसून येत आहे. या वाढत्या उष्णतेचा परिणाम कासव संवर्धनाला जाणवू लागला आहे. दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्याच्या किनार्‍यावर ऑलिव्ह रिडले जातीची कासवे अंडी घालण्यासाठी मोठ्याप्रमाणात येत असतात. मंडणगडच्या किनार्‍यापासून राजापूरच्या टोकाला असणार्‍या माडबन, वाडावेत्ये या किनार्‍यापयर्र्त कासवे अंडी घालण्यासाठी येत असल्याची नोंद वनविभागाकडे करण्यात येत आहे. पूर्वी कासवे किनार्‍यावर अंडी घालून गेल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ अंडी शोधून ती खाण्यासाठी वापरत असत किंवा कोल्हे, कुत्रे ही अंडी फस्त करीत असत. परंतु वनविभागाकडून कासवसंवर्धन मोहीम राबवण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक कासव मित्र म्हणून तरुण वर्गाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे कासव बचाव मोहीमेला वेग आला. अगदी मच्छीमारांच्या जाळ्यात आलेली कासवेही पुन्हा समुद्रात सोडण्यात येऊ लागली आहेत.

दक्षिण रत्नागिरीतील रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील पाच ठिकाणी कासव संवर्धन मोहीम मागील काही वर्षापासून सुरु असून नवनवीन किनार्‍यांवर ग्रामस्थ स्वत:हून पुढाकार घेत वनविभागाशी संपर्क करीत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील गावखडी पाठोपाठ मालगुंड गायवाडी किनार्‍यावर कासव संवर्धन मोहीमेला यश आले आहे. या वर्षी भाट्ये येथील जागरुक तरुणांमुळे कासवांची अंडी घातलेली आठ घरटी आढळून आली होती. त्या पाठोपाठ राजापूर तालुक्यातील माडबन व वाडावेत्ये या ठिकाणी कासवांच्या अंड्यांची घरटी आढळली होती. नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपयर्र्त कासवे अंडी घालण्यासाठी किनार्‍यावर येत असतात. त्यानंतर 40 ते 50 दिवसांच्या अंतराने या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. एक कासव हंगामात तीन वेळा अंडी घालते. यात पहिल्यावेळी दिडशे ते दोनशे, दुसर्‍यावेळी शंभर ते एकशे चाळीस तर तिसर्‍या वेळी 65 ते शंभरच्या दरम्यान अंडी देते. कासव मित्रांच्या मदतीने वन विभागाने कासवांची घरटी शोधून त्यांचे सुरक्षित संवर्धन रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील पाच किनार्‍यांवर केले आहे. अशीच संवर्धन मोहीम गुहागर, दापोली व मंडणगड येथेही राबवण्यात आली आहे. एप्रिल अखेरपर्यंत अंड्यातून पिल्ले बाहेर पडत समुद्राकडे झेपावत असतात.

सापडलेल्या अंड्यांपैकी खराब झाल्याचे प्रमाण यापूर्वी दहा ते पंधरा टक्के होते. त्यामुळे पिल्ले मोठ्याप्रमाणात बाहेर पडून त्यांना समुद्रात सोडण्यात येत होते. यावेळीही सुरुवातीला अंड्यातून पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण चांगले होते. परंतु मार्चच्या अखेरच्या आठवड्यात व एप्रिलच्या सुरुवातील चटका लावणार्‍या उष्णतेमुळे त्याचा फटका या कासवाच्या अंड्यांनाही बसला आहे. वाळूमध्ये हे संवर्धन होत असल्याने वाळू तापल्याने मागील वर्षीपेक्षा यंदा वीस ते तीस टक्के अंडी अधिक खराब झाली आहे.

23 हजार अंड्यांतून पावणेअकरा हजार पिल्ले

रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील पाच किनार्‍यांवर 23 हजार 27 अंडी आढळून आली होती. त्यातून 10 हजार 796 पिल्लेच बाहेर पडली आहेत. यातील अनेक अंडी वाढलेल्या उष्णतेमुळे खराब झाली असल्याचे पाहणी दिसून आले आहे. त्यामुळे कासवांच्या पिलाच्या जन्मदराबाबत गांभीर्य व्यक्त करण्यात आले असून अद्यापही संवर्धनाचे काम सुरू असले तरी त्यातून किती पिल्ले बाहेर पडतील यावर कासवमित्र व वन विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT