पुढारी ऑनलाईन डेस्क : Turkey Terrorist Attack : तुर्कीची राजधानी अंकारा येथे संसदेजवळ रविवारी भीषण बॉम्बस्फोट झाला. यादरम्यान गोळीबार झाल्याचीही चर्चा आहे. या घटनेत किती नुकसान झाले याचा अंदाज अद्याप आलेला नाही. या भीषण बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा आणि तपास यंत्रणांचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. राजधानी अंकारामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तुर्की सरकारने हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.
तुर्कस्तानच्या गृह मंत्रालयाने या स्फोटाचे वर्णन 'दहशतवादी हल्ला' असे केले आहे. मंत्रालयाने सांगितले की, 'लष्करी वाहनातून दोन आत्मघाती हल्लेखोर सकाळी साडेनऊ वाजता सुरक्षा महासंचालनालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचले आणि त्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात सहभागी असलेल्या दहशतवाद्याने स्वत:ला उडवले, तर तर दुसरा हल्लेखोर पोलिसांशी झालेल्या गोळीबारात ठार झाला. या हल्ल्यात दोन पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाले.'
तुर्की मीडियाच्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी तुर्कीच्या संसचेची इमारत आहे. आज (दि. 1) राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याआधीच हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे.