इस्तंबूल, वृत्तसंस्था : एकापोठापाठ एक महाभयंकर भूकंपाने हादरलेल्या तुर्कीला आगामी पाच दिवस भूकंपाचा धोका असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान तुर्कीतील बचावकार्यात बर्फवृष्टीमुळे प्रचंड अडथळे येत असून त्यामुळे ढिगार्याखालून माणसांना जिवंत काढणे कठीण होत जाणार आहे. आताच मृतांचा आकडा अडीच हजारांच्या जवळ गेला असून तुर्की आणि सिरीयातील भूकंपबळींची संख्या दहा हजार होण्याची भिती वर्तवली जात आहे.
युनायटेड स्टेटस् जिओलॉजिकल सर्व्हेच्या अहवालानुसार पहिल्या तीन भूकंपानंतर 78 आफ्टरशॉक (नंतर बसलेले धक्के) नोंदवले गेले. या सर्व धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 4 पेक्षा जास्त होती. पहिल्या भूकंपानंतर झालेल्या 7 मोठ्या भूकंपांच्या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 5 पेक्षा जास्त होती. आणखी पुढेही काही दिवस आफ्टरशॉक जाणवतील, असे युनायटेड स्टेटस् जिओलॉजिकल सर्व्हेचे म्हणणे आहे.
तुर्कियेतील अनेक भागांत पारा शून्याखाली गेला आहे. भूकंप आला तेव्हाही या भागांत बर्फवृष्टी सुरू होती. भूकंपानंतर पाऊस सुरू झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. अनेक ठिकाणी धुके पसरले आहे. तुर्कियेतील अनेक विमानतळेही भूकंपाच्या तडाख्यात सापडल्याने धावपट्ट्या उखडल्या आहेत. अन्य देशांतून मदत सामग्री पाठविणेही अडचणीचे ठरत आहे.
नेदरलँडमधील शास्त्रज्ञ फ्रँक होगरबीट्स यांनी 3 फेब्रुवारी रोजी एका ट्विटद्वारे दक्षिण मध्य तुर्किये, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप होऊ शकतो, असे भाकीत वर्तविले होते. ते खरे ठरले आहे. फ्रँक हे सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण नावाच्या भूवैज्ञानिक संस्थेत वरिष्ठ संशोधक आहेत. त्यांचे 3 फेब्रुवारीचे ट्विट भूकंपानंतर व्हायरल होत आहे.