Latest

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: चांदणी चौकातील वाहतूक रात्री अडीच तास बंद; स्फोटाद्वारे खडक फोडण्याचे काम

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: चांदणी चौकातील जुना पूल पाडण्यात आल्यानंतर तेथे सेवा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या भागातील खडक नियंत्रित स्फोटाद्वारे फोडण्यात येणार असून मंगळवारी (4 ऑक्टोबर) रात्री अकरा ते मध्यरात्री दीड वाजेपर्यंत मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे. काम पुर्ण होताच परत वाहतूक पुर्ववत करण्यात येणार आहे.

चांदणी चौकातील पूल पाडण्यात आल्यानंतर तेथील खडक फोडून सेवा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी खडक नियंत्रित स्फोटाद्वारे फोडण्यात आला. त्यामुळे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक थांबविण्यात आली होती. मंगळवारी (4 ऑक्टोबर) रात्री अकरा ते मध्यरात्री दीड वाजेपर्यंत नियंत्रित स्फोटाद्वारे खडक फोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिली.

सातारा, पुण्याहून जाणार्‍या हलक्या आणि प्रवासी वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सातारा, पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे- वडगाव पूल, वारजे पूल, आंबेडकर चौक, वनदेवी चौक, कर्वे पुतळा चौक, नळस्टॉप, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, विद्यापीट चौक, राजीव गांधी पूल, ओैंध, वाकडमार्गे बाह्यवळण मार्गावर वाहनांनी जावे.

मुंबईहून सातार्‍याकडे जाणार्‍या हलक्या आणि प्रवासी वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे. मुंबईहून सातार्‍याकडे जाणार्‍या हलक्या आणि प्रवासी वाहनांसाठी पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे- वाकड चौकातून डावीकडे वळून राजीव गांधी पुलावरुन विद्यापीठ चौक, संचेती चौक, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्ता, जेधे चौक, स्वारगेट, पुणे-सातारा रस्ता, कात्रज चौक, कात्रज जुना घाट किंवा कात्रज चौकातून नवले पुलावरुन डावीकडेवळून मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर जावे. भूमकर चौकातून डावीकडे वळून डांगे चौक, रक्षक चौक, राजीव गांधी पुलावरुन, विद्यापीठ चौकातून, शिवाजीनगर मार्गे वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे. किवळे चौकातून रावेत डांगे चौकमार्गे, रक्षक चौक, राजीव गांधी पूल, विद्यापीठ चौक, शिवाजीनगरमार्गे इच्छितस्थळी जावे. राधा चौकातून डावीकडे वळून बाणेर रस्त्याने विद्यापीठ चौक, शिवाजीनगरमार्गे इच्छितस्थळी जावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT