Latest

उरुळी-फुरसुंगी कचरा डेपोचा कायापालट; 16 हजार झाडांची लागवड, पर्यटनस्थळ म्हणून विकास

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोचा मागील 20 वर्षांत मोठ्या प्रमाणात कायापालट झाला असून, हा परिसर सध्या दुर्गंधी व माशीमुक्त करण्यात महापालिकेला यश आले आहे. याशिवाय प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार अमृतवन योजनेंतर्गत देशी प्रजातीच्या 16 हजार झाडांची लागवड केली आहे. दरम्यान, हा परिसर कचरा व्यवस्थापनाचे धडे देणारे पर्यटनस्थळ म्हणून येत्या काळात विकसित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

डॉ. कुणाल खेमनार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत, कार्यकारी अभियंता सुधीर चव्हाण, उपअभियंता राजेंद्र तिडके, अभियंता संकेत जाधव यांच्या पथकाने उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपो भेटीदरम्यान प्रकल्पाची माहिती दिली.

कोथरूड येथील कचरा डेपो 1989 मध्ये या ठिकाणी हलविण्यात आला. हा प्रकल्प 163 एकर जागेमध्ये आहे. न्यायालय, एनजीटी आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने वेळोवेळी दिलेले आदेश आणि महापालिकेने येथील समस्या दूर करण्यासाठी न्यायालयात केलेली प्रतिज्ञापत्र यानुसार मागील 20 वर्षांत महापालिका प्रशासनाने काम केले आहे. देवाची उरुळी- फुरसुंगी डेपोमध्ये कचरा डंपिंग यापूर्वीच बंद करण्यात आले आहे. पूर्वी साठलेल्या कच-याचे बायोमायनिंग करून 21 एकरहून अधिक जागा रिकामी करण्यात आली आहे. येत्या डिसेंबरपर्यंत सुमारे 20 लाख मेट्रिक टन कच-यावरील बायोमायनिंग प्रक्रिया पूर्ण होईल.

या ठिकाणी 2004 पासून कच-याचे कॅपिंग करण्यात आले असून, कच-यापासून निर्माण होणारा मिथेन गॅस हवेतच पेटवून नष्ट करण्याची यंत्रणा उभारली आहे. आगीच्या घटनादेखील कमी झाल्या असून, अग्निशामक गाड्यांची व्यवस्था करण्यात आल्याने आगीच्या घटना जवळपास बंद झाल्या आहेत. या ठिकाणी 200 मे. टन मिश्र कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून सेंद्रिय खतनिर्मिती होत आहे. शासनाच्या विविध विभागांच्या परवानगीने खुल्या बाजारात शेतकर्‍यांना नाममात्र दरात खतविक्री होत आहे.

या प्रकल्पाच्या छतावरच सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात आला असून, येथे 100 किलोवॅट वीजनिर्मिती होते. कचरा डेपोच्या आवारातील प्रकाशव्यवस्था व कार्यालयांमधील विजेची गरज यातून भागविली जात आहे. कचरा डेपोच्या आवारातील बफर झोनमध्ये अमृत वन योजनेंतर्गत देशी प्रजातीची तब्बल 16 हजार झाडे लावण्यात आली आहेत. कचरा व्यवस्थापनामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेल्या उपाययोजनांमुळे अभ्यासकांसाठी हा कचरा डेपो पर्यटनस्थळ झाला आहे. कचरा व्यवस्थापना बाबत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी पर्यटनस्थळाच्या दृष्टीने परिसराचा विकास करण्यात येईल, अशी माहिती डॉ. खेमनार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT