नेत्यांची मर्जी सांभाळून आपला स्वार्थ साधून घेणार्या लाळघोट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतीय राजकारणातील हा लाळघोटेपणा सर्वच सुज्ञ लोकांंची चिंता वाढवणारा आहे. आपल्या स्वार्थासाठी देश, मित्र व आपलेच बांधव यांचा बिनदिक्कत बळी देणार्यांना ही व्यक्ती निरपराधी आहे, असे वाटत नसावे का? तपास यंत्रणेतील अधिकारी हा 'आयएएस' अथवा 'आयपीएस' किंवा 'आयआरएस' परीक्षा पास झालेला असतो. आपले राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी जर एखाद्या स्वच्छ नेत्याला कारस्थान रचून अडकविण्याचा आदेश या अधिकार्यांना काही कडबोळ्या राजकीय नेत्यांकडून दिला जात असेल, तर पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार्या सनदी अधिकार्यांनी टी. एन. शेषन यांच्यासारखा बाणेदारपणा दाखवून, असे आदेश पायदळी तुडवायला हवेत.
ग्रीक तत्त्ववेत्ता अॅरिस्टॉटल हा प्रकांड पंडित होता. मानसशास्त्र, तर्कशास्त्र, शरीरविज्ञान, शोकांतिका या विषयांवर त्याने लिहिलेले विद्वत्ताप्रचूर ग्रंथ हे त्याच्या पांडित्याचे पुरावे आहेत. अॅरिस्टॉटल हा प्लेटोचा अत्यंत आवडता शिष्य. प्लेटोने 'अॅकॅडमी'ची स्थापना करून आपली गुरुपरंपरा सुरू ठेवली होती.
अॅरिस्टॉटल एकदा आपल्या विद्यार्थ्यांशी वर्गात तत्त्वज्ञानाची चर्चा करीत असताना एका विद्यार्थ्याने प्लेटोचे विधान त्याच्या तोंडावर फेकून अॅरिस्टॉटलला पेचात आणण्याचा प्रयत्न केला; पण प्रथम त्याने त्याकडे दुर्लक्ष केले, पण पुन्हा त्या विद्यार्थ्याने प्लेटोचा आधार घेऊन आपला हेका जेव्हा चालूच ठेवला तेव्हा मात्र अॅरिस्टॉटलने आपल्या मनाचा तोल जाऊ न देता त्याला शांतपणे सुनावले, "मला सॉक्रेटिस प्रिय आहे, प्लेटोही प्रिय आहे; पण सत्य सर्वाधिक प्रिय आहे". आज जगाला अॅरिस्टॉटलच्या या उपदेशाची गरज आहे.
स्वराज्याचा महान सेनानी संताजी घोरपडेंवर छापा टाकून त्यांचा शिरच्छेद करणारा व त्यांचे मुंडके औरंगजेबाच्या स्वाधीन करून मोबदल्यात इनाम उपटणारा नागोजी माने हा संताजींसारखा मराठाच होता; पण स्वराज्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणार्या संताजी घोरपडेंच्या शौर्यावर नागोजी मानेंच्या स्वार्थांधतेने मात केली. तीच गत तात्या टोपे यांची झाली. तेे झोपले असताना त्यांना पकडून ब्रिटिशांच्या स्वाधीन करण्याचा पराक्रम करून दाखवणारा फितूर हा भारतीयच होता.
जागतिक इतिहासात स्वार्थांध होऊन देशद्रोह करणारे आणि आपल्याच नेत्यांवर टपून बसलेल्या सरकारच्या हवाली करणारे लाळघोटे भारतीय जसे पाहावयास मिळतात तसेच पाश्चात्य देशातही असे गद्दार भरपूर आढळतात. येशू ख्रिस्तांना रोमन अधिकार्यांच्या हवाली करणारा ज्युडस व त्यांना वधस्तंभावर लटकावण्याचे पाप करणारा येशूचा पट्टशिष्य हा येशूच्या 12 शिष्यांपैकी एक होता. त्याने सोन्याच्या 30 नाण्यांसाठी देवमानव असलेल्या आपल्या गुरूला दगा दिला. नंतर पापक्षालनासाठी त्याने आत्महत्या केली खरी, परंतु त्यामुळे येशू ख्रिस्तांचा जीव परत आलेला नाही. त्याचे पापक्षालन व्यर्थ गेले.
सध्याच्या राजकारणातही अशाच लोकांची बजबजपुरी माजली आहे. स्वार्थ हाच त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव झालेला आहे, सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याचे नुकतेच कोकणात अटक केलेल्या प्रकारावरून दिसून आले. भष्टाचाराने पोखरलेल्या भारतीय व्यवस्थेबद्दल माजी केंद्रीय दक्षता आयुक्त एन. विठ्ठल यांचे उद्गार अत्यंत बोलके आहेत.
"सध्याच्या पद्धतीत काळा पैसा आणि भष्टाचाराचा आधार घेतल्याशिवाय लोकप्रतिनिधी निवडून येऊच शकत नाही", असे एन. विठ्ठल एका व्याख्यानात बोलताना म्हणाले होते. गेल्या 70 वर्षांत भारतात प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठाच्या शैक्षणिक सुधारणांसाठी नेमण्यात आलेल्या सर्वच चौकशी समित्यांनी त्यांच्या निष्कर्षांमध्ये सर्वाधिक भर चारित्र्यसंवर्धनावरच दिलेला आहे. तरीही आज प्रत्यक्षात सार्वजनिक क्षेत्रात चारित्र्याचा अभाव दिसतो आहे. राजकारण्यांचे चारित्र्य तर आता टिंगलटवाळीचा विषय बनला आहे. त्यामुळे लोकांना सत्यनिष्ठ करण्यासाठी व त्यांच्या स्वार्थाला आळा घालण्यासाठी शिक्षण कुचकामी ठरत तर नाही ना, अशी शंका येते.
– देविदास लांजेवार