सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजा जवळ शनिवारी (दि. २५) सकाळी कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत मुत्युमुखी पडलेला गिर्यारोहक हेमंत गाला. 
Latest

सिंहगडाच्या कोसळलेल्या कड्याखाली चिरडून पुण्यातील गिर्यारोहकाचा दुर्दैवी मृत्यू

अमृता चौगुले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा: सिंहगड किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या बुरुजाजवळ २५ जून सकाळी कोसळलेल्या कड्याच्या दरडखाली चिरडून पुण्यात निष्णात गिर्यारोहक हेमंत धिरज गोला (वय ३१, रा. मित्र मंडळ चौक, पुणे ) यांचा दुर्दैवी मुत्यु झाला. शनिवारी (दि. २५) मध्यरात्रीच्या अंधारात बँटरीच्या मिणमिणत्या प्रकाशात साडेबारा वाजण्याच्या सुमारास घनदाट जंगलातील १५० फूट खोल दरीत उतरून स्थानिक निधड्या मावळ्यांनी दोराच्या साह्याने हेमंत याचा मृतदेह बाहेर काढला. हेमंत याच्या दुर्दैवी मृत्यूने गाला कुटुंबासह त्याच्या मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.

हेमंत हा एकलुता एक मुलगा होता. त्याच्या मागे आई, वडील, बहिण असा परिवार आहे. तो अविवाहित होता. हेमंत याला ट्रेकिंग, गिर्यारोहणाची लहानपणापासून आवड होती. निष्णात गिर्यारोहक म्हणून प्रसिद्ध होता. त्याने राज्यातील गडकोट, सुळके, दुर्गम किल्ले सर केले. हिमालयातही त्याने ट्रेकिंग केले होते. ट्रेकिंग स्पर्धेत त्याने मोठे यश मिळवले होते. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी आयोजित केलेल्या सिंहगड एथिक्स ट्रेकिंग स्पर्धेत हेमंत गाला याच्यासह राज्यभरातील ३०० ट्रेकर्स सहभागी झाला होते. मात्र हेमंत हा गडावरून परत आला नसल्याने त्याच्या वडिलांनी त्याचा शोध सुरू केला.

त्यानंतर रात्री हेमंत बेपत्ता असल्याची माहिती हवेली व राजगड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर हवेलीचे ठाणे अमंलदार रामदास बाबर यांनी सिंहगड वनविभागासह स्थानिक ट्रेकर्सला कळविले. माहिती मिळताच रात्री १० वाजण्याच्या सुमारास हेमंत गाला याचा शोध घेण्यासाठी घेरा सिंहगडचे माजी उपसरपंच अमोल पढेर यांच्यासह काही तरुण कडा कोसळल्या दरीत गेले. कल्याण दरवाजाच्या पाऊल वाटेपासून १५० फूट खोल दरीतील कोसळलेल्या कड्याच्या दरडीचा मोठा मलवा पडला.

रात्रीच्या अंधारामुळे बँटरीच्या मिणमिणत्या उजेडात कसेबसे पढेर व तरुण दरीत पोहचले. कोसळलेल्या कड्याच्या दगड, भरावाखाली बँग व पायात बुट असलेली व्यक्ती चिरडला असल्याचे समजले. तोपर्यंत रात्री साडे दहाच्या सुमारास सिंहगड वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके बँटरी घेऊन मणेरवाडी येथील मावळा जवान संघटनेचे गिर्यारोहक तानाजी भोसले, सिंहगडचे सुरक्षा रक्षक शंकर डोंगरे, रमेश खामकर, योगेश गोपी, खानापूर येथील धनंजय सपकाळ, विश्वनाथ जावळकर, शेखर जवळकर, ज्ञानेश्वर जवळकर आदींसह कल्याण दरवाजात दाखल झाले.

दुर्गम कड्याखालील खोल दरीत पडलेल्या मोठा दगड, धोंड्याखाली खाली असलेला हेमंत याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी तानाजी भोसले व योगेश गोपी खोल दरीत उतरले. त्यांच्या मदतीला धनंजय सपकाळ, मनोज, विश्वनाथ जावळकर मदतीला आले. हेमंत याच्या अंगावरील मोठा दगड काढताना मृतदेह खोल दरीत कोसळण्याची भिती होती. त्यामुळे हेमंत याच्या मृतदेहाचे पाय दोरीने बांधून ठेवले. नंतर तानाजी भोसले व विश्वनाथ जावळकर यांनी भला मोठा दगड उलगद हळूहळू बाजूला काढून दरीत ढकलला.

दोरीच्या साह्याने तयार केलेल्या बांबूच्या स्टेचरमधून मृतदेह दोराच्या साह्याने दरीतून बाहेर काढला. तब्बल तासभर काळोख्या अंधारात दुर्गम दरीत निधड्या छातीच्या मावळ्यांनी प्राणाची बाजी लावत मदतकार्य केले. त्यानंतर कल्याण दरवाजातुन पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह गडाच्या वाहनतळावर आणला. तेथुन तो हवेली पोलिसांनी शवविच्छेदनासाठी ससुन रुग्णालयात नेण्यात आला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT