देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
पांढुर्ली गावातील पवार परिवारातील सदस्य व मित्रांनी लग्नाच्या पहिल्या मुळासाठी चक्क बैलगाडीतून नववधूला सासरी आणत, जुनी कालबाह्य झालेली परंपरा जोपासली. या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
पांढुर्लीतील सखाराम पवार यांचे चिरंजीव अनिकेत व उल्हास वाजे यांची कन्या कोमल यांचा विवाह नुकताच झाला. लग्नानंतर माहेराहून पहिल्या मुळासाठी गेलेल्या नववधूला आणण्यासाठी पवार परिवार व मित्रांनी दोन बैलगाड्या सजवून थेट वाजे परिवाराच्या वस्तीवर पोहोचल्या. पहिल्या मुळासाठी बैलगाड्या बघून वाजे परिवारालाही आनंद झाला. पाहुणचार व सत्कार समारंभ आटोपून नववधू कोमलला बैलगाडीत बसवून सासरी आणण्यात आले. कालमानाप्रमाणे बदललेली जुनी परंपरा पवार परिवाराने जपल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यात सरपंच पंढरीनाथ ढोकणे, छगनराव पवार, निवृत्ती वाजे, कुंडलिक पवार, बाळासाहेब पवार, गंगाराम पवार आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.