Mamata Banerjee 
Latest

आगामी लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा काँग्रेसला पाठिंबा, मात्र ठेवली ‘ही’ अट

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले. या निकालामुळे काँग्रेस पक्षाला संजीवनी मिळाली आहे. तर भाजपविरोधी पक्षांनाही आता काँग्रेसचा विचार करणे भाग पडले आहे. बिहारचे मुख्‍यमंत्री नितीशकुमार हे भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्रीत आणण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. आता काँग्रेसच्‍या कर्नाटकमधील विजयामुळे भाजप विरोधी पक्षांचे नेतृत्‍व कोणाकडे जाणार याचीही चर्चा सुरु झाली आहे. अशातच पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. मात्र त्‍यांनी यासाठी काँग्रेससमोर एक अटही ठेवली आहे.

कर्नाटक विजयावर माध्‍यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या की, २०२४ लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस हा पक्ष काँग्रेसला पाठिंबा देईल. ज्‍या मतदारसंघांमध्‍ये काँग्रेस पक्ष मजबूत आहे तेथे तृणमूल त्‍यांना पाठिंबा देईल. मात्र प्रादेशिक पक्ष ज्‍या मतदारसंघांमध्‍ये निवडून येण्‍यास सक्षम आहे तेथे काँग्रेसने पाठिंबा देणे आवश्‍यक असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

तृणमूल काँग्रेसने २००९ आणि २०११ मधील निवडणुकीत काँग्रेसबरोबर आघाडी केली होती. मात्र २०१२ मध्‍ये त्‍यांनी काँग्रेसची साथ सोडत एकला चलो रेचा नारा दिला. यानंतर त्‍यांनी मागील दहा वर्षांमध्‍ये सातत्‍याने काँग्रेस नेत्‍यांवर टीका करणे, राहुल गांधी यांना लक्ष्‍य करणे सुरु होते. मात्र आता त्‍यांनी पुन्‍हा एकदा युटर्न घेत काँग्रेसला सहकार्य करण्‍याची भाषा केल्‍याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

ममता बॅनर्जी यांचे काँग्रेसबरोबर असणारे नाते

ममता बॅनर्जी यांनी आपल्‍या राजकीय कारकीर्दीची सूरुवात काँग्रेसमधूनच केली होती. मात्र केंद्रीय व राज्‍यातील नेतृत्‍वाबरोबरील मतभेदांमुळे त्‍यांनी काँग्रेसचा राजीनामा देत १९९८ मध्‍ये 'ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस' पक्षाची स्‍थापना केली. जुलै २००८ मध्‍ये डाव्‍या आघाडीने अणुकराराच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPA सरकारचा पाठिंबा काढून घेतला, तेव्हा ममता बॅनर्जी यांच्‍या तृणमूल काँग्रेसच्‍या एकमेव खासदाराने UPA सरकारला समर्थन दिले होते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि तृणमूलची आघाडी झाली. काँग्रेस नेतृत्‍वाखालील संयुक्‍त पुरोगामी आघाडीच्‍या दुसर्‍या टर्ममध्‍ये ममता बॅनर्जी रेल्‍वे मंत्री झाल्‍या.

२०११ च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्‍हा काँग्रेसबरोबर आघाडी केली. या आघाडीने पश्‍चिम बंगाल विधानसभेच्‍या एकूण २२८ जागा जिंकल्या राज्यातील डाव्यांची ३४ वर्षांची सत्ता संपुष्टात आली. ममतांनी प्रथमच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि काँग्रेस त्यांच्या आघाडी सरकारमध्ये सामील झाले होते. मात्र जुलै २०१२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रणव मुखर्जींना यूपीएचे उमेदवार म्हणून नाव दिले. त्‍यावेळी तृणमूल काँग्रेसने मुखर्जी यांच्‍या नावाला विरोध केला. ममता बॅनर्जी यांनी अखेरच्‍या क्षणी अनिच्छेने पाठिंबा जाहीर केला. अखेर दोन्‍ही पक्षातील मतभेद वाढतच गेले. अखेर सप्टेंबर २०१२ मध्ये तृणमूलने UPA सरकारला पाठिंबा काढून घेतला.

यानंतर दोन्‍ही पक्षांनी स्‍वतंत्रच निवडणूक लढवली. यानंतर काँग्रेसने डाव्या आघाडीशी आघाडी केली. २०१६ आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या, परंतु तृणमूल काँग्रेसने दोन्ही विधानसभेच्‍या निवडणुकीत बाजी मारली. आता  आगामी लाेकसभा निवडणुकीत दाेन्‍ही पक्ष पुन्‍हा आघाडी करण्‍याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT