पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता येथे आयोजित भव्य सभेत आज (दि.१०) मार्च तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्व 42 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यासह चित्रपट कलाकार आणि क्रिकेटपटूंचा समावेश आहे. (TMC Announces The Names Of 42 Candidates For Lok Sabha Elections ) जाणून घेवूया तृणमूल काँग्रेसच्या यादीतील चर्चेतील चेहरे…
अभिषेक बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत. ते डायमंड हार्बरमधून निवडणूक लढवणार आहेत. अभिषेक यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९८७ रोजी झाला. सध्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून केली होती. (TMC Announces The Names Of 42 Candidates For Lok Sabha Elections )
तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा आसनसोल मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात भाजपनेही भोजपुरी स्टार पवन सिंगला उमेदवारी दिली आहे. येथे दोन बिहारी चित्रपट कलाकार आमने-सामने असून, ही लढत बहुचर्चित ठरणार आहे. गायक बाबुल सुप्रियो यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर या जागेवरून विजय मिळवला होता; मात्र काही महिन्यांमध्येच त्यांनी राजीनामा देवून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०२१ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ते मंत्री झाले. पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांचा सुमारे तीन लाख मतांच्या फरकाने पराभव केला होता. पूर्वश्रमीचे भाजपचे नेते असणारे शत्रुघ्न सिन्हा या मतदारसंघात पुन्हा बाजी मारणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
तृणमूल काँग्रेसने माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांना वर्धमान दुर्गापूर मतदारसंघातून तिकिट दिले आहे. ते १९८३ क्रिकेट विश्वविजेत्या संघातील खेळाडू आहेत. कीर्ती आझाद यांनी २०१४ बिहारमधून लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. शिस्तभंग केल्याप्रकरणी त्यांना 23 डिसेंबर 2015 रोजी भाजपने पक्षातून निलंबित केले होते. २०१९ लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते धनबाद लोकसभा मतदारसंघातून लढले. या वेळी भाजपच्या पशुपती नाथ सिंह यांनी त्यांचा 4.8 लाख मतांच्या फरकाने पराभव केला. नोव्हेंबर २०२१ मध्ये कीर्ती आझाद यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजकारणातून निवृत्ती होईपर्यंत या पक्षासाठी काम करत राहीन असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
तृणमूल काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत माजी भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण याच्याही नावाचा समावेश आहे. युसूफ पठाण बहरामपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. त्याचा सामना काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी होणार आहे. (TMC Announces The Names Of 42 Candidates For Lok Sabha Elections )
तृणमूल काँग्रेसच्या वादग्रस्त खासदार अशी ओळख असणार्या महुआ मोईत्रा यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्या कृष्णनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेल्या महुआ यांनी लंडनमधील एका प्रतिष्ठित बँकिंग कंपनीत काम कले. त्या या कंपनीच्या उपाध्यक्ष होत्या. त्या नोकरीचा राजीनामा देवून पुन्हा मायदेशात परतल्या. बंगालच्या राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. महुआ यांनी पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारण्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. त्यानंतर लोकसभेच्या नैतिक आचरण समितीने या प्रकरणात महुआ यांना दोषी ठरवत संसदेतून निलंबित केले होते. ८ डिसेंबर २०२३ ला त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यांना पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसने निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
बसीरहाट लोकसभा मतदारसंघातील संदेशखाली हे गाव देशभरात गाजले. येथे महिलांवर लैंगिक अत्याचार आणि जमीन हडप प्रकरणामुळे तृणमूल काँग्रेसला विरोधी पक्षांनी घेरले. त्यामुळे या मतदारसंघात तृहणूल काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. येथील खासदार , अभिनेत्री नुसरत जहाँ यांचे तिकिट कापण्यात आले आहे. आता त्यांच्या जागी हाजी नुरुल इस्लाम यांना तृहणमूलने उमेदवारी दिली आहे. (TMC Announces The Names Of 42 Candidates For Lok Sabha Elections )
हेही वाचा :