पुढारी डिजीटल : रोज सकाळी लवकर किंवा नियोजित वेळेत उठणं हा आपल्यापैकी अनेकांसाठी अवघड टास्क असतो. कितीही गजर लावा किंवा इतर उपाय करा अनेकजण सकाळी लवकर उठणं मात्र जमवू शकत नाहीत. आदल्या रात्रीची झोप पूर्ण न होणं हे यामागचं मुख्य कारण असलं तरी बरेचदा प्रयत्न करूनही वेळेत जाग येत नाही. तुम्हालाही अशाच समस्येला सामोरं जावं लागत असेल तर या टिप्स जरूर वापरा.
अलार्म आणि बेड लांबच हवेत : सकाळी अलार्म बंद करून झोपण्याची अनेकांना सवय असते. यामुळेच अनेकदा उठायला उशीर होतो. त्यामुळे झोपताना कायमच अलार्म आणि बेड एकमेकांपासून लांब असतील याची खात्री करा. मोबाइल उशाशी ठेवलेला असेल आणि त्यालाच अलार्म असेल तर ती सवयही टाळा.
नियोजन तर हवंच : केवळ लवकर उठायचं असं ठरवून सवय लागतेच असं नाही. सकाळी लवकर उठणं म्हणजे नेमकी किती लवकर उठायला हवं याबाबत ठरवणं गरजेचं आहे. याशिवाय सकाळी लवकर उठल्यावर करावयाच्या कामाचं नियोजन महत्त्वाचं आहे. त्यामुळे लवकर उठण्याची आपसूकच प्रेरणा मिळते.
एकदम बदल नको : रोज 9 वाजता उठण्याची सवय असलेल्या व्यक्तीने एकाएकी सकाळी पाच वाजता उठायला सुरुवात केली तर काय होईल ? तिची झोप पूर्ण होईलच असं नाही याशिवाय अचानक झालेल्या बदलाने तिचं रुटीन बिघडेल ते वेगळंच. त्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय लावणार असाल तर छोट्या छोट्या बदलांनी सुरुवात करा. रोजच्या वेळेपेक्षा 15-20 मिनिटं आधी उठण्यापासून सुरुवात केल्याने त्रास होणार नाही.
21 दिवस तरी हवेतच : कोणतीही सवय लागण्यासाठी साधारणत: 21 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे लवकर उठण्याची सवय लावून घ्यायची असेल तर त्याला पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे या सवयीत किमान 21 दिवसांचं सातत्य गरजेचं असतं.
स्वत:ची पाठ थोपटा : सकाळी लवकर उठल्यानंतरच्या छोट्या अचिवमेन्टसाठी स्वत: ची पाठ थोपटायला अजिबात विसरू नका. यामुळे रोज वेळेत उठण्यासाठी प्रेरणा मिळेल.