पुणे; वृत्तसेवा : मंडईतील रामेश्वर चौक परिसरात पूर्ववैमनस्यातून दुचाकीस्वार तरुणावर गोळीबार करून पसार झालेल्या मुख्य आरोपीसह तिघांना गुन्हे शाखेने पकडले. त्यांच्याकडून पिस्तूल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. तर यापूर्वी फरासखाना पोलिसांनी चौघांना पकडले आहे. नाना पेठेत काही महिन्यांपूर्वी अक्षय वल्लाळ या तरुणाचा खून झाला होता. वल्लाळ याच्या खून प्रकरणाचा सूड उगविण्यासाठी तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
याप्रकरणी रूपेश राजेंद्र जाधव (वय 24, रा. कुंभारवाडा, नाना पेठ), प्रथमेश ऊर्फ गणेश गोपाळ येमूल (वय 22, रा. नाना पेठ), बाळकृष्ण विष्णू गाजुल (वय 24, रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली. तर, फरासखाना पोलिसांनी ऋषिकेश राजेश बिटलिंग, अमर कृष्णाहरी बोलावत्री, नीरज कटकम, सिद्धार्थ पांगारे या चौघांना अटक केली आहे. गोळीबारात शेखर अशोक शिंदे (वय 32) जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
गजबजलेल्या मंडई भागात दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या दरम्यान दुचाकीस्वार शेखरला अडवून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली होती. पसार झालेल्या आरोपींचा गुन्हे शाखेच्या युनिट 1 कडून शोध घेण्यात येत होता. आरोपी रूपेश आणि साथीदार प्रथमेश कोंढवा भागात थांबल्याची माहिती पोलिस कर्मचारी अमोल पवार आणि अजय थोरात यांना मिळाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.
त्यांचा साथीदार बाळकृष्ण याला मार्केट यार्ड परिसरात सापळा लावून पकडण्यात आले. आरोपींकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. तपासात आरोपींनी अक्षय वल्लाळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. वल्लाळ याचा किशोर शिंदे आणि महेश बुरा या दोघांनी नाना पेठेत खून केला होता. वल्लाळ याचा मावसभाऊ बाळकृष्ण गाजुल याने कट रचून किशोरचा भाऊ शेखर याच्यावर हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, कर्मचारी इम—ान शेख, अय्याज दड्डीकर, दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, नीलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.