Latest

सायबर विश्वात ‘जपून चाल’

Arun Patil

ऑनलाईन सेवांच्या विस्तारामुळे आपले जीवन जितके सोपे झाले आहे, तितकेच सायबर गुन्ह्यांचा धोकाही वाढला आहे. खरेतर देशातील सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यास होत असलेला विलंब आणि लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे गुन्हेगार आपल्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होत आहेत. देशाची राजधानी दिल्ली, केंद्रशासित प्रदेश चंदिगड आणि हरियाणामध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे, ही बाब चिंताजनक आहे.

हरियाणातील मेवात हे सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून खंडणीचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे. परिस्थिती इतकी चिंताजनक आहे, की गेल्या तीन वर्षांत आर्थिक फसवणूक करून 10,390 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. सायबर गुन्हेगारांच्या सुनियोजित टोळ्या लोकांची फसवणूक करून कष्टाने कमावलेल्या पैशावर हातोहात डल्ला मारत आहेत. अशिक्षित-सुशिक्षित सर्व स्तरातील लोक या लबाड गुन्हेगारांच्या सापळ्यात अडकत आहेत.

ही समस्या इतकी गुंतागुंतीची झाली आहे, की देशातील प्रति एक लाख लोकसंख्येमागे 129 सायबर गुन्हे नोंदवले गेले आहेत. राजधानी दिल्लीत हा आकडा प्रतिलाख लोकसंख्येमागे 755, चंदिगडमध्ये 432 आणि हरियाणामध्ये 381 आहे. या ठिकाणी सायबर गुन्ह्यांचे प्रमाण अधिक होण्याचे एक कारण म्हणजे ऑनलाईन पर्यायांच्या जागरूकतेमुळे अधिक लोक या सेवा वापरत आहेत. मात्र, सायबर गुन्ह्याच्या मायावी दरोडेखोरांच्या फसव्या खेळ्यांची माहिती नसल्याने लोक पटकन गुन्हेगारांच्या जाळ्यात येतात.

वास्तविक पाहता, देशाच्या केंद्रीय एजन्सी गुन्हेगारांवर सातत्याने नजर ठेवून त्यांच्याविरोधात सातत्याने मोहीम राबवत आहेत. मेवातसह अनेक राज्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविरोधात मोठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय एजन्सींनी 2.9 लाख बनावट सिम, 2810 यूआरएल आणि 595 मोबाईल अ‍ॅप ब्लॉक केले आहेत. असे असतानाही या कारवाईमुळे सायबर गुन्हे कमी होत नाहीत. पोलिस आणि तपास यंत्रणांच्या सक्रियतेनंतरही सायबर गुन्हेगार आपल्या कारवाई पार पाडण्यात यशस्वी होत आहेत, हीच खरी चिंतेची बाब आहे. सायबर गुन्ह्यांची व्याप्ती आणि गुंतागुंत इतकी मोठी आहे, की पोलिसही त्यांना सहजासहजी पकडू शकत नाहीत. आज संपूर्ण जगभरात गुन्हेगारी विश्वात सायबर गुन्हेगारी हा प्रमुख धोका बनला आहे. या दरोडेखोरांना लगाम लावण्यासाठी आपण आपल्या पोलिसांना पूर्णपणे प्रशिक्षण देऊ शकलो नाही. शिवाय नागरिकांचेही प्रबोधन पुरेशा प्रमाणात केले गेेलेले नाही.

दुसरीकडे, गुन्ह्यांचे स्वरूप पाहिल्यास 2023 मध्ये, सर्व सायबर गुन्ह्यांपैकी 38 टक्के गुंतवणुकीशी संबंधित फसवणूक होते. यानंतर ग्राहक सेवेच्या नावाखाली आवश्यक माहिती घेऊन किंवा केवायसी पूर्ण झाल्याची खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याची प्रकरणे उघडकीस आली. एवढेच नाही तर सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून पैसे उकळल्याची अनेक प्रकरणेही उघडकीस आली आहेत. यामध्ये व्हिडीओ कॉलद्वारे अश्लील दृश्यांसह त्यांची छायाचित्रे जोडून बदनामी करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात. यामुळे सायबरतज्ज्ञ अज्ञात व्हिडीओ कॉलला प्रतिसाद न देण्याचा सल्ला देत आहेत. असा कॉल उचलल्यास लैंगिक शोषणाचे बळी ठरण्याचा धोका आहे.

2022 ते 2023 या एक वर्षाच्या काळात देशात सायबर गुन्ह्यांमध्ये 61 टक्के वाढ होणे, हा एक गंभीर इशारा आहे. 2019 मध्ये नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल सुरू झाल्यानंतर लोकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये पैसे गमावलेल्या 4.3 लाख नागरिकांचे झालेल्या नुकसानीपैकी 1,127 कोटी रुपये वसूल करता आले. आधुनिक काळात अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने जगभरात मोठी क्रांती झाली आहे. त्याचा वापर चांगल्या कामाबरोबरच वाईट कामासाठी केला जातो. लोक सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडतात, हे खूपच चिंताजनक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT