Latest

गांधी विचारांची दिशादर्शकता

Arun Patil

गांधी हे माणसांमधील विवेक, शहाणपण आणि सद्सद्विचाराचे नाव होते. सत्याची धारणा त्यांच्या राजकीय जीवनातही सुटली नाही. सत्तेचा प्रभाव पडावा असे त्यांच्या हाती काहीच नव्हते. मात्र गांधी हा माणूस नैतिकतेच्या सर्वोच्च उंचीवर होता. मानवी मूल्यांची वाट चालणारा निर्मळ अंत:करणाचा पांथस्थ होता. जेथे जेथे मानसिक संघर्ष करण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा हा माणूस केवळ मानवी मूल्यांच्या सोबत राहिला. व्यक्तीच्या विचार प्रक्रियेत गोंधळलेली स्थिती येते तेव्हा तेव्हा गांधी विचार समाज आणि व्यवस्थेला दिशादर्शक ठरतो.

आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आपल्यात नाहीत. ते गेले तेव्हा देशात काय घडले हे येथील माणसांनी अनुभवले आहे. त्यांनी अखंड जीवनभर अहिंसेचा विचार मस्तकी घेतला होता. त्या अहिंसेच्या विचाराचा आज बळी जाताना दिसतो आहे. मोठी माणसे जे विचार पेरतात, तो विचार पुढे न्यायचा असतो. संकटे जेव्हा येतात तेव्हाच त्यांनी पेरणी केलेल्या तत्त्वांची अधिक गरज निर्माण होत असते. गांधीजींचा मृत्यू हा अवघ्या जगासाठी धक्कादायक होता. त्यांचे जाणे नैतिकतेवरील हल्ला होता का? त्यांचा मृत्यू हा भारतासाठी अंधाराचे साम्राज्य निर्माण करणारे होते. त्यामुळे पंडित नेहरू म्हणाले होते की, प्रकाश आपल्यातून निघून गेला. हा प्रकाश नैतिकतेचा, मानवतेचा होता. तो प्रकाश अविवेकाच्या अंधारात चाचपडणार्‍या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच चळवळींना दिशादर्शक होता.

गांधी हे माणसांमधील विवेक, शहाणपण आणि सद्सद्विचाराचे नाव होते. त्यामुळे गांधींच्या विचारापासून दूर जाणे म्हणजे माणूसपण गमावणे होते. त्यांच्या विचारांचे बोट सुटल्यावर काय होते हे आपण आजही अनेक क्षेत्रात पाहत आहोत. भोवताल युद्धाच्या खाईत लोटला जात आहे. शांततेच्या वाटांवरती युद्धाचे ढग दाटून येत आहेत, मत्सर वाढतो आहे. मानवी जीवनातील निकोपता हरवली आहे. इमारतीची उंची वाढते आहे आणि त्याचवेळी माणसांची उंची हरवत चालली आहे. आपल्या भोवती आज छोट्या माणसांच्या सावल्या मोठ्या पडू लागल्या आहेत. त्या सावल्या र्‍हासाचे प्रतीक आहेत. त्यामुळे जगात आजही अनेक राष्ट्रप्रमुखांना गांधी विचाराचाच प्रकाश अंधाराचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी अधिक योग्य वाटतो आहे. गांधी कोण होते? ज्यामुळे जगावर त्यांच्या विचारांचे साम्राज्य प्रस्थापित झाले आहे. ते ना सत्ताधारी होते, ना कोणत्या राजकीय पक्षाचे प्रमुख होते. सत्तेचा प्रभाव पडावा असे त्यांच्या हाती काहीच नव्हते; मात्र गांधी हा माणूस नैतिकतेच्या सर्वोच्च उंचीवर होता. मानवी मूल्यांची वाट चालणारा निमर्र्ळ अंत:करणाचा पांथस्थ होता. केवळ माणसांत माणूसपण पाहणारी मूल्येच प्रभाव टाकू शकली. त्यामुळे व्यक्तीच्या विचार प्रक्रियेत गोंधळलेली स्थिती येते तेव्हा तेव्हा गांधी विचार समाज आणि व्यवस्थेला दिशादर्शक ठरतो. गांधीजी म्हणत असे की, गांधीवाद नावाचा कोणताही वाद नाही. माझेकडे सांगण्यासारखे काहीच नाही. माझे जीवन हाच विचार आहे. त्यांनी आपल्या जीवनात निवडलेली वाट कृतीशीलतेची होती. जे अंतर्मनाला पटते तेच ते करत होते. ते ज्या पाऊलवाटेने जात होते. ती वाट षडरिपूंनी अंधारलेपण आणले असेल तर त्यावर मात करण्यासाठी प्रकाशाची वाट होती. त्यामुळे ते म्हणाले माझ्याकडे सागंण्यासारखे जे आहे ते म्हणजे सत्य आणि अंहिसा. ही मूल्येच उंच शिखरासारखी अनंतकाळापासून मार्गदर्शक आहेत. हा विचार घेऊन जी माणसे चालत राहतात ती वैश्विक आणि व्यापक बनतात.

गांधीजींनी या मूल्यांचा विचार संपूर्ण जीवनभर अनुसरला. त्यामुळे ते अखंड विश्वावर अधिराज्य करू शकले. हा माणूस मूल्यांचा इतका गंभीरपणे विचार करीत होता, की ती मूल्ये म्हणजे जीवनाचे तत्त्वज्ञान बनले होते. त्यांच्या व्यक्तिगत मूल्यांचा प्रभाव त्यांच्या सामाजिक जीवनातही कायम होता. सत्याची धारणा त्यांच्या राजकीय जीवनातही सुटली नाही. वर्तमानात राजकीय जीवनात सत्तेचा धारणा प्रभावी होत असल्याने त्यात सत्याचा लवलेशही सामान्य माणसांना दिसत नाही. त्यामुळे राजकीय पक्ष, त्यांच्या चळवळी सामान्यांना आपल्या वाटत नाही. राजकीय पक्ष बोलतात, आश्वासन देतात पण तो निवडणुकीचा जुमला म्हणून देशातील नागरिकांना फसविले जाते. ते फसविणे, खोटी आश्वासने देणे हे अनैतिकच आहे. असे फसविणे हे गांधीजीच्या राजकीय जीवन प्रवासात दिसत नाही. त्यांच्या या नैतिक प्रवासामुळे इंग्रज राजसत्तेलाही धाक होता.

शस्त्राच्या धाकापेक्षा गांधीजींच्या नैतिकतेचा आणि मूल्यांचा अधिक धाक होता. शस्त्राच्या लढाईत इंग्रजांनी अनेेकांना पराभूत केले; पण निःशस्त्र असलेल्या या नैतिक साधनाच्या लढाईत इंग्रज जिंकू शकले नाहीत. गांधीजी 'चले जाव चळवळी' दरम्यान तुरुंगात होते. ते तुरुंगात असताना समाजात मात्र दंगा सुरू होता. या निर्माण झालेल्या परिस्थितीला गांधी जबाबदार आहेत, असे ब्रिटिशांना वाटत होते. त्यावेळेचे जनरल स्मटस यांनी त्यांच्याच सरकारवर तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. महात्मा गांधी हे महापुरुष आहेत. गांधी हे फार महान आहेत, असे त्यांनी मत नोंदवले होते.

गांधीजींचा समग्र प्रवास हा जीवन मूल्यांचा होता. त्यामुळे इंग्रजांच्या अनेक अधिकारी, नेत्यांनाही त्यांच्यात माणूस दिसला. गांधीजी अखंड जीवनात उच्च मूल्यांचा स्वीकार करत जगत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये जगातील अनेकांना येशूची करुणा दिसली. राग, लोभ, मद, मत्सर, अहंकाराचा त्यांना स्पर्शही झाला नाही. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर जगप्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन श्रद्धांंजली वाहताना म्हणाले होते की, गांधी नावाचा एक हाडामांसाचा माणूस या पृथ्वीतलावर वावरला होता यावर पुढची पिढी कदाचित विश्वास ठेवणार नाही, अशा शब्दांत गांधीजींना श्रद्धांजली वाहिली होती. यावरून त्यांचा मार्ग किती कठीण होता हे अधोरेखित होते. गांधी अहिंसेचे पालन करीत होते, पण त्यांची अहिंसेची वाटही अत्यंत उंचीची होती. त्यांनी आयुष्यात केवळ शारीरिक हिंसेचा विचार केला नाही. त्या पलिकडे मानसिक हिंसेलाही तेवढेच महत्त्व दिले. त्यांचे स्मरण जयंती, पुण्यतिथी पुरते नाही तर मूल्यांच्या वाटेवरून चालतांना सतत होत राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT