Latest

आई बहिणींवर लाठीहल्ला करणाऱ्यांचा पराभव करावा लागेल : शरद पवार

backup backup

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जालन्यातील उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर कारण नसताना पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यात अनेक महिला, शेतमजूर, शेतकरी, लहान बालके जखमी झाले. कुणाच्या आदेशावरून हा लाठीहल्ला झाला, हे सरकारमधल्या लोकांनी स्पष्ट करावं. परंतु आता आपल्याला आई बहिणींवर लाठीहल्ला करणाऱ्यांचा पराभव करावा लागेल, असा हुंकार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भरला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची संत बहिणाबाईंच्या कर्मभूमीत म्हणजेच जळगावमध्ये 'स्वाभिमान सभा' पार पडली. या सभेला स्वत: शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, रोहिणी खडसे, गुलाबराव देवकर, माजी आमदार बी. एस पाटील उपस्थित होते.

यावेळी केलेल्या भाषणात शरद पवार यांनी केंद्रीय भाजप आणि महाराष्ट्र राज्य शासनाला लक्ष्य केलं. ते म्हणाले, "देशात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. गेली काही वर्ष ईडी सीबीआयसारख्या यंत्रणांचा गैरवापर होतोय. त्यातूनच नवाब मलिक यांना जेलमध्ये टाकलं गेलं. फोडाफोडीशिवाय ९ वर्षात पंतप्रधान मोदींनी काय केलं, याचं उत्तर त्यांनी द्यावं. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. फोडाफोडी करणाऱ्यांना संधी मिळताच योग्य उत्तर द्यावं लागेल".

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्ट असल्याचे आरोप केले. मला त्यांनी विनंती करायची आहे की- देशातील सत्ता तुमच्या हातात आहे, राज्यातही तुमची सत्ता आहे. जर आमच्यापैकी कुणी चुकीचं काम केलं असेल तर खटला भरा, चौकशी करा आणि आरोप खोटे असतील तर त्याची सजा तुम्ही काय घेणार ते आम्हाला सांगा", असंही पवार म्हणाले.

पुढे बोलताना पवार म्हणाले, "जालन्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी काही मराठा आंदोलक आंदोलनाला बसले होते. शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यात अनेक महिला, शेतमजूर, शेतकरी, लहान बालके जखमी झाले. कारण नसताना हा लाठीहल्ला करण्यात आला. या लाठीहल्ल्याचं स्पष्टीकरण शासनाने दिलं पाहिजे, याला जबाबदार कोण हे सांगितलं पाहिजे. पण मला तुम्हाला सांगायचंय की आई बहिणींवर लाठीहल्ला करणाऱ्यांचा आपल्याला पराभव करावा लागेल"

"शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट आहे. शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळाची धग खान्देशातही जाणवते आहे. धरणात पाणी कमी आहे. पण दुष्काळाबाबत राज्य शासन गंभीर नाहीये. तिकडे नाशिकचा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, शेतकरी भीक मागत नाही, कष्टाची किंमत मागतोय", असं म्हणत पवारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT