वॉशिंग्टन : 15 एप्रिल 1912 ही इतिहासातील अशी तारीख आहे, जेव्हा टायटॅनिक (Titanic) जहाजातील 1 हजार 513 जणांनी आपला जीव गमावला. 10 एप्रिल 1912 या दिवशी 19 व्या शतकातील सर्वात मोठे जहाज ब्रिटनच्या साऊथॅम्प्टन बंदरातून न्यूयॉर्कला निघाले होते. मात्र, 'कधीही न बुडणारे जहाज' अशी जाहिरात करून निघालेले हे जहाज आपल्या पहिल्याच सफरीत, अवघ्या चारच दिवसांच्या प्रवासानंतर हिमनगाला धडकून अटलांटिक महासागरात बुडाले! या जहाजात माणसांसोबत त्यांचे पाळीव श्वान देखील होते. मिळालेल्या माहितीनुसार, टायटॅनिक जहाज बुडाले त्यावेळी त्यात 12 कुत्र्यांच्या देखील समावेश होता. ज्यातील नऊ कुत्र्यांनी अपघातात आपला जीव गमावला तर तीन कुत्र्यांच्या जीव वाचला.
अमेरिकन केनेल क्लबच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या अपघातात जहाजावर (Titanic) असलेल्या 12 कुत्र्यांपैकी तीन कुत्र्यांचे प्राण वाचले. यातील दोन कुत्रे पामेरेनियन जातीचे होते तर एक कुत्रा पेकिंगिज जातीचा होता. पहिल्या पामेरेनियन कुत्र्याला मार्गारेट बेचस्टीन हेस यांनी पॅरिसहून खरेदी केले होते. दुसरा पोमेरेनियन कुत्रा हा मार्टिन आणि एलिझाबेथ जेन रॉथस्चाईल्ड यांचा होता. तिसरा पेकिंगिज जातीचा वाचलेला कुत्रा हा मायरा आणि हेन्री एस. हार्पर यांचा होता.
वॉशिंग्टन पोस्टच्या एका वृत्तानुसार, टायटॅनिक (Titanic) जहाज हे 19 व्या शतकातील असे जहाज होते, जे कधीच पाण्यात बुडणार नाही, असे सांगितले जायचे. या जहाजाची उंची 17 मजली इमारतीएवढी असल्याचे सांगितले जाते. या जहाजाला चालवण्यासाठी दर दिवशी 800 टन कोळशाचा वापर व्हायचा. असे म्हटले जाते की टायटॅनिकमध्ये 3 फुटबॉल मैदानांएवढी जागा होती आणि या जहाजाचे हॉर्न इतके जोरात वाजायचे की 11 मैल अंतरावरूनही त्याचा आवाज ऐकू येत होता. टायटॅनिकचे अवशेष समुद्रात वेगाने विरघळत आहेत.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 20 ते 30 वर्षांपर्यंत टायटॅनिकचे (Titanic) अवशेष पूर्णपणे पाण्यात विरघळून जातील आणि समुद्राच्या पाण्यात एकजीव होईल. समुद्रात आढळणारे जीवाणू टायटॅनिकचे लोह वेगाने खात आहेत. हे समुद्री जीवाणू दररोज सुमारे 180 किलो कचरा खातात. टायटॅनिकचे उरलेले अवशेष बाहेर काढणे हे खूप धोकादायक आणि खर्चिक काम आहे. समुद्रात जहाजाचे अवशेष इतके सडले आहे की ते बाहेर काढल्यावर फक्त त्याचे गंजलेले लोखंडी तुकडे सापडतील.